अल्पवयीन मुले अश्लील साईटच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:38 PM2018-07-18T22:38:11+5:302018-07-18T22:38:30+5:30
शहरासह ग्रामीण भागातही सध्या स्मार्ट फोनचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक व्यक्तीसह अल्पवयीन मुला-मुलीकडेही स्मार्ट फोन आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : शहरासह ग्रामीण भागातही सध्या स्मार्ट फोनचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक व्यक्तीसह अल्पवयीन मुला-मुलीकडेही स्मार्ट फोन आले आहेत. पण लहान मुलांकडून याचा दुरूपयोग वाढल्याची बाब निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुले या माध्यमातून अश्लिल साईटला भेटी देत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. संचार क्षेत्रातील क्रांतीमुळे सर्वत्र मोबाईलचे जाळे पसरले आहे. या जाळ्यात शहरीसह ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थीही गुरफटत आहेत. मुले संपर्कात राहावी यासाठी त्यांच्या हाती मोबाईल देण्याचा घातक प्रकार सुरू झाला आहे. त्याचबरोबर अनेक पालकांना स्मार्टफोन समजत नसल्याने त्यांचे फोनही लहान मुलेच सांभाळतात. पण गेम खेळण्याचा नांदात ही मुले आता मोबाईलच्या सहाय्याने अश्लील साईटला भेटी देत असल्याचे प्रकार समोर येत आहे.
मुलामुलींच्या हट्टापायी पालक सर्रास त्याच्या हातामध्ये स्मार्टफोन सोपवत आहेत. त्यामुळे लहान मुले त्याचा वाटेल तसा वापर करीत आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या साईटमधून व्हिडीेओ घेणे आणि इतरांना सुद्धा देण्याचा प्रकार वाढला आहे. स्मार्ट फोनमुळे हे सहज शक्य व स्वस्तही झाले आहे.
कुटुंब प्रमुख असो अथवा घरातील इतरही लोकांसमोर मुलगा मोबाईलवर गुंग राहतो. मुले पालकांना मोबाईल मागून घेत त्यात डोके खुपसून बसतात. घरोघरी हाच प्रकार पाहावयास मिळत आहे. पण आपला मुलगा मोबाईलमध्ये काय पाहतो. याची तपासणी पालकांनी करणे गरजेचे झाले आहे.
शहरी व ग्रामीण भागात अनेक मोबाईल शॉपी सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये १४ ते २५ वयोगटातील मुले-मुली मोबाईल खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. त्यामुळे पालक नसताना लहान मुलांना मोबाईल विकावा लागतो. धंदा असल्याने आम्ही मुलांनाही मोबाईल विक्री करतो,अशी माहिती मोबाईल विक्रेत्याने लोकमतशी बोलताना दिली.
एकीकडे शाळेत सादर करावयाचे प्रकल्प अधिकाधिक चांगल्या प्रकारे बनविण्यासाठी स्मार्टफोनचा वापरही काही मुले करीत आहेत. त्यामुळे एकीकडे स्मार्टफोन ही गरज असली तरी त्याचा सावधगिरी वापर करणे आवश्यक आहे .मुलं यातून काय पाहतात याकडे पालकांचे लक्ष असायलाच हवे.
-अल्का पंडीत, मानसशास्त्र तज्ज्ञ