अमानुष! ... ‘भावाने’ केला बहिणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:34 AM2020-07-16T11:34:19+5:302020-07-16T11:43:26+5:30
बहिणभावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कारंजा येथे उघडकीस आली. येथे राहणाऱ्या एका सावत्र भावाने आपल्या बहिणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बहिणभावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कारंजा येथे उघडकीस आली. येथे राहणाऱ्या एका सावत्र भावाने आपल्या बहिणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. ही पिडिता गर्भवती झाल्याने हे प्रकरण उजेडात आले. कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कारंजा नजीकच्या एका गावात अल्पवयीन मुलीवर सावत्र भावाने अनेकदा अत्याचार केला. सुमारे वर्षभरापूर्वीपासून सावत्र भाऊ पीडितेवर अत्याचार करीत आहे. पीडितेला मासिक पाळी न आल्याने तिची आई तिला रुग्णालयात घेऊन गेली. प्रकृती स्थिर न झाल्याने शनिवारी पीडितेच्या आईने तिला कन्नमवारग्राम येथील शासकीय रूग्णालयात नेले. तेथे तपासणीअंती ती गर्भवती असल्याचे पुढे आले.
त्यानंतर पीडितेने सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. सावत्र भावानेच वारंवार अत्याचार केल्याचे समजताच पीडितेसह तिच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी कारंजा पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली आहे. पुढील तपास कारंजा (घा.) पोलीस करीत आहेत. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी पीडितेची आहे.