वर्ध्यातही सीसीआयच्या कापूस खरेदीची सहकार विभागाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 07:58 PM2020-06-16T19:58:11+5:302020-06-16T19:58:49+5:30

सहकार विभागाकडून सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या प्रत्येक शेतकऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘आपला कापूस विकला काय, नसेल तर किती कापूस शिल्लक आहे?’ अशी विचारणा सुरू केली आहे.

Inquiry from CCI's cotton procurement department in Wardha too | वर्ध्यातही सीसीआयच्या कापूस खरेदीची सहकार विभागाकडून चौकशी

वर्ध्यातही सीसीआयच्या कापूस खरेदीची सहकार विभागाकडून चौकशी

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा खणखणतोय भ्रमणध्वनीनोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळा सुरू झाला तरी सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या शेतकऱ्यांची कापूस खरेदी संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. अपेक्षित कापसाची खरेदी पूर्ण झाली, तरीही आकडा मात्र फुगलेलाच दिसून येत असल्याने सहकार विभागाकडून आता चौकशीला प्रारंभ झाला आहे. सहकार विभागाकडून सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या प्रत्येक शेतकऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘आपला कापूस विकला काय, नसेल तर किती कापूस शिल्लक आहे?’ अशी विचारणा सुरू केली आहे.
जिल्ह्यामध्ये गतवर्षी २ लाख ३४ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये सरासरी २५ लाख ६७ हजार क्विंटल कापसाचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला होता. लॉकडाऊनपूर्वी सीसीआय, महाकॉट व खासगी व्यापाऱ्यांनी २३ लाख क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण केली. लॉकडाऊनमुळे खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी करण्याकरिता नोंदणी करण्यात आले. आठही तालुक्यातील ५० हजार १३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. दरम्यानच्या काळात ३३ खरेदी केंद्रांवरून कापूस खरेदी सुरू केली असून एकूण २९ लाख ५० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तरीही २३ हजार २८२ शेतकऱ्यांकडे २ लाख ५० हजार क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे सांगितले जात असल्याने या नोंदणीतील सत्यता पडताळून पाहण्याकरिता सहकार विभागाने चौकशी आरंभली आहे. या चौकशीच्या पहिल्याच टप्प्यात ८ हजार ७०५ शेतकऱ्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. शेवटपर्यंत जवळपास २० हजार शेतकऱ्यांची नावे बाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. त्यामुळे आता या चौकशीअंती सीसीआय केंद्रही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील कापसाचे उत्पादन आणि विकलेला कापूस यात तफावत असल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून विचारपूस सुरू आहे. पहिल्याच टप्प्यात ८ हजार ७०५ शेतकरी बाद झालेत. हा आकडा आणखी वाढणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी आणि सीसीआय व महाकॉटने खरेदी केलेल्या कापूस उत्पादकांची यादी तपासली जाणार आहे. यात नोंदणी नसलेल्या व्यक्तीचा कापूस खरेदी केल्याचे निदर्शनास आल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, वर्धा.

Web Title: Inquiry from CCI's cotton procurement department in Wardha too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस