१५०० रुग्णांची तपासणी व औषधींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 10:44 PM2017-09-02T22:44:04+5:302017-09-02T22:44:33+5:30
ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवेत बरीच तफावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवेत बरीच तफावत आहे. ही तफावत दूर करून ग्रामीण रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी म्हणून पं. दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त आरोग्य शिबिरे घेण्यात येत आहे. शनिवारी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. यात १५०० रुग्णांची तपासणी करून मोफत औषधीचे वितरण केले गेले. स्थानिक विकास निधीतून १० खाटा व रुग्णवाहिका देण्याची घोषणा यावेळी खा. रामदास तडस यांनी केली.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या अध्यक्षतेत आयोजित शिबिराचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून भाजप प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, जिल्हा सरचिटणीस अविनाश देव माजी खासदार सुरेश वाघमारे, जि.प. आरोग्य सभापती जयश्री गफाट, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल नारलवार, नगराध्यक्ष शीतल गाते, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, पं.स. सदस्य किशोर गव्हाळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजीव बतरा, न.प. आरोग्य सभापती ममता बडगे, पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे आदी उपस्थित होते.
यावेळी खा. तडस म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा अभाव जाणवतो. या शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य स्वस्थ ठेवण्याचा भाजपा शासनाचा प्रयत्न आहे. या शहराचा विकास व्हावा, नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून या ग्रामीण रुग्णालयात खासदार निधीतून १० खाटा व १० लाख रुपये खर्चाची रूग्णवाहिका देऊन चांगली रुग्णसेवा देऊ, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. १९४२ मध्ये महात्मा गांधींनी चले जाव आंदोलन सुरू केले व इंग्रजांना देश सोडण्यास बाध्य केले. या आंदोलनाचा व त्यातील शहिदांचा काँग्रेस शासनाला विसर पडला होता. चले जाव आंदोलनाला आज ७५ वर्षे झाली. त्या आंदोलनाचे स्मरण म्हणून भाजप शासनाने स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान सुरू केले, असे डॉ. रामदास आंबटकर यांनी सांगितले. याप्रसंगी माजी खासदार वाघमारे, अविनाश देव, जयश्री गफाट, संजय गाते यांनीही मनोगत व्यक्त केले.
शिबिराला नितीन बडगे, न.प. उपाध्यक्ष आशिष गांधी, राजीव जयस्वाल, शहराध्यक्ष मंगेश झाडे, नगरसेवक, सभापती, ग्रामीण रुग्णालय, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), भाजयुमो आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश झाडे, संचालन आकाश दुबे, राजू पनपालिया यांनी केले तर आभार जितेंद्र वर्मा यांनी मानले.