आमदारांकडून शहरातील विकासकामांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:21 PM2018-01-14T23:21:20+5:302018-01-14T23:21:32+5:30
शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांचा दर्जा, वेग व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेवून रविवारी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शहराच्या विविध विकास कामांची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांचा दर्जा, वेग व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेवून रविवारी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शहराच्या विविध विकास कामांची पाहणी केली. पाहणी दरम्यान आढळून आलेली अनियमितता, कामाचा मंदावलेला वेग व खालावलेला दर्जा पाहुन आमदारांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या देत सूचना दिल्या.
शहरात राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून कोट्यावधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. या कामांच्या दर्जा व गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी आ. भोयर यांना प्राप्त झाल्या होत्या. कामे संथगतीने सुरू असून कामाच्या दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आज हा पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, बांधकाम सभापती नौशाद शेख, माजी बांधकाम सभापती निलेश किटे, नगरसेवक गोपी त्रिवेदी, यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य पंकज सायंकार यांची उपस्थिती होती.
आ. भोयर यांनी वंजारी चौक ते गजानन सायकल स्टोअर्स, बजाज चौक येथील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाची पाहणी केली. यावेळी पुलालगत अतिक्रमणासंदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांची चर्चा करून जाहीर हुसैन कॉलनी व परिसरात जाणाऱ्या पर्यायी मार्गाची चर्चा केली. जुना मार्ग बंद करण्यात येवू नये अशी मागणी यावेळी प्रभागाच्या नगरसेवक व नागरिकांनी केली असता या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. जिल्हा ग्रंथालयाच्या विस्तारीकरणाची पाहणी करून सदर काम २६ जानेवारी पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. डॉ. आंबेडकर पुतळा ते बजाज चौक या मार्गालगत होत असलेल्या नाली बांधकाम, बॅचलर रोड येथील आर्वी नाका ते धुनिवाले मार्गावरील रस्ता व नाली बांधकामाची पाहणी करून काही नागरिकांशी चर्चा केली. यात नागरिकांत मतभेद असल्याचे समोर आले. या मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी वंदना भुते, कैलास राखडे, अभिषेक त्रिवेदी, शुभांगी कोलते, जयंत सालोडकर, सुरेश आहुजा, आशिष वैद्य, निलेश खोंड, सतिश मिसाळ, शरद आडे, सुरेश पट्टेवार, सुमीत गांजरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता विलास मून, अभियंता हिवरे, चांदोरे, राणे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता वाघ, न.प.चे नगर अभियंता सुधीर फरसोले, अभियंता निलेश नंदनवार, सुजीत भोसले, शंकर शेंडे, मनिष सुरजुसे, सचिन होले व नागरिक उपस्थित होते.
नाली सरळ करण्याच्या सूचना
मुख्य डाकघर चौकात नालीला वळण देण्यात आल्याची बाब नगरसेवकांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. सदर आडवळण पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त करीत अधिकाऱ्यांना शनिवारपर्यंत नाली सरळ करण्याचे निर्देश दिले. भुयारी गटारी योजनेमुळे विकासकामांत मोठा अडथळा निर्माण होत असल्याने जीवन प्राधिकरण, नगर परिषद व बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी बैठक घेवून यावर तोडगा काढावा अशी सूचना आ. भोयर यांनी केली.