लोकसभा निवडणुकीच्या स्थिर सर्वेक्षण पथकाची जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 04:49 PM2019-03-23T16:49:02+5:302019-03-23T16:49:24+5:30
चांदूर रेल्वे विधानसभा क्षेत्रातील नेमण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने जिल्हाधिकारी यांचे वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. वर्धा लोकसभा मतदार संघामध्ये अमरावती जिल्हयातील धामणगाव व मोर्शी विधान क्षेत्राचा समावेश असल्यामुळे जिल्हाधिकारी तथा वर्धा लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी विवेक भिमनवार यांनी धामणगाव व मोर्शी विधानसभाक्षेत्रातील स्ट्राँग रुमची पाहणी करण्याकरिता जात असतांना चांदूर रेल्वे विधानसभा क्षेत्रातील नेमण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने जिल्हाधिकारी यांचे वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी वाहनाखाली उतरुन तपासणी करणाऱ्या पथकाला सहकार्य केले. संपूर्ण वाहनाची तपासणी झाल्यानंतर त्यांनी पथकाला आपले ओळखपत्र दाखविले. तेव्हा निवडणुकीच्या कामात नेमण्यात आलेल्या पथकाने आपले कर्तव्य व्यवस्थित पार पडले. त्यामुळे जिल्हयात नेमण्यात आलेले कर्मचारी आपले कर्तव्य बजावित असल्याचा प्रत्यय जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना आला.
पोलिसांनी रात्री काढला मार्च
ग्रा.पं. निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू असलेला राज्यातील वर्धा हा एकमेव जिल्हा आहे. जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराच्या शेजारीच्या बोरगाव (मेघे) येथे शुक्रवारी क्षुल्लक कारणावरून तीन कुटुंबात हाणामारी झाली. यात सात जण जखमी झाले. या घटनेमुळे ग्रा.पं. निवडणूक होऊ घातलेल्या बोरगाव (मेघे) मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशीरा शहर पोलिसांनी बोरगाव (मेघे) परिसरात मार्च काढून शक्ती प्रदर्शन केले. या मार्च मध्ये शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्यासह दंगल नियंत्रक पथकाचा समावेश होता.