इन्स्पायर अवॉर्ड व पायाभूत चाचणीचा प्रारंभ एकाच दिवशी
By admin | Published: September 10, 2015 02:39 AM2015-09-10T02:39:24+5:302015-09-10T02:39:24+5:30
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणीचे वेळापत्रक निर्धारित केले.
प्रदर्शन पुढे ढकला : शिक्षक समितीची मागणी
वर्धा : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणीचे वेळापत्रक निर्धारित केले. याच कालावधीत जिल्ह्याच्या इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामुळे पायाभूत चाचणीचे कार्यान्वयन प्रभावित होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत प्रदर्शन पुढे ढकलावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने बुधवारी केली.
उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या अनुदानातून इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन जिल्हास्तरावर दरवर्षी घेतले जाते. यावर्षी १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत प्रदर्शन आयोजित आहे. राज्य शासनाने २२ जून रोजी शासन निर्णय निर्गत करून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू केला. यात सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रथम भाषा व गणित विषयाची पायाभूत चाचणी १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत घ्यायची आहे. राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचे वास्तव पूढे येणार असल्याने चाचणीचे महत्त्व मोठे आहे. चाचणी व प्रदर्शन दोन्हीचा शुभारंभ एकाच दिवशी होत आहे. याच कालावधीत सुट्या व सण आहेत. परिणामी, चाचणी कार्यान्वयन करणे अडचणीचे ठरणार आहे. ही बाब लक्षात घेत इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन पूढे ढकलावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासनाला निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)