४९ हजार कुटुंबांशी साधणार संवाद
By admin | Published: August 18, 2016 12:39 AM2016-08-18T00:39:20+5:302016-08-18T00:39:20+5:30
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात कुटुंबस्तर संवाद अभियान राबविण्यात येत आहे.
कुटुंबस्तर संवाद अभियान : ४३७ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेसाठी भेटीगाठी उपक्रम
वर्धा : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात कुटुंबस्तर संवाद अभियान राबविण्यात येत आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना नेमण्यात येणाऱ्या संवादकांमार्फत भेटी दिल्या जाणार आहेत. शिवाय जिल्ह्यातील २०१६-१७ या वार्षिक कृती आराखड्यात समाविष्ट ४३७ ग्रामपंचायतीमधील ४९ हजार २१८ कुटुंबांशी संवाद साधण्यात येणार आहे. यात ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व सांगण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत शौचालयाचे प्रमाण वाढावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जनजागृतीच्या माध्यमातून शौचालयाचे प्रमाण वाढवित असताना स्वच्छ भारत मिशनच्यावतीने प्रती शौचालय लाभार्थी १२ हजार रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कारही देण्यात येत आहे. यामुळे हळूहळू ग्रामीण भागात शौचालयाचे प्रमाणही वाढत आहे. शासनाच्या निर्देशानुसार २०१६-१७ या वर्षात संपूर्ण वर्धा जिल्हा हागणदारी मुक्त करावयाचा आहे. त्यानुसार ४३७ ग्रामपंचायतमधील ४९ हजार २१८ कुटुंबांना गृहभेटी अभियानात भेट देऊन शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. यात गावस्तरावरील ग्रामपंचायत पदाधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, गावस्तरीय कर्मचारी, विद्यार्थी, गट संसाधन केंद्रातील कर्मचारी, संपर्क अधिकारी आदी संवादक म्हणून काम करणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर प्रती कुटूंब ५० याप्रमाणे तीन संवाद गट तयार केले जाणार आहेत. प्रत्येक गटात दोन संवादक राहणार आहे. अभियान कालावधीमधील गृहभेटीचा आढावा नियमित तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर घेतला जाणार आहे. त्यांचा अहवाल शासनास नियमित दिला जाणार आहे.
शासनाकडून गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी निर्मलग्राम अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत शौचालय निर्मितीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे; पण ग्रामीण भागात शौचालयांप्रती जागरुकता नसल्याने गावे हागणदारी मुक्तीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)
अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत स्तरावर
गृहभेटी अभियानाचा शुभारंभ २२ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायतस्तरावर करण्यात येणार आहे. यात स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, संवादक प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे अभियानाचा शुभारंभ आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये करणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शौचालय आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हागणदारीमुक्तीचे प्रयत्न होणार आहेत.
सनियंत्रण अधिकारी
अभियानाबाबत नियमितपणे माहिती जिल्हास्तरावर देण्याकरिता प्रत्येक तालुक्यात एका अधिकाऱ्याची सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अभियानाच्या प्रगतिबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात येणार आहे.