वर्धेत लागणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘नम्मा टॉयलेट’; राज्यातील पहिलेच शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:32 AM2017-12-21T09:32:05+5:302017-12-21T09:33:59+5:30
वर्धा नगर पालिकेअंतर्गत शहरात पाच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नम्मा मॉडेल शौचालय लावण्यात येत आहे. नम्मा शौचालय लावणारे वर्धा हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे.
अभिनय खोपडे ।
आॅनलाईन लोकमत
वर्धा : वर्धा नगर पालिकेअंतर्गत शहरात पाच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नम्मा मॉडेल शौचालय लावण्यात येत आहे. नम्मा शौचालय लावणारे वर्धा हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने ४ कोटींचा अतिरिक्त निधी वर्धा नगर पालिकेला दिलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिला. त्यानंतर देशभर स्वच्छता कार्यक्रम लोकचळवळ म्हणून राबविण्यात येऊ लागला. वर्धा शहरात १९ प्रभागात तब्बल तीन महिने दर रविवारी स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. आरोग्य स्वच्छता व कर वसूली या कामात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वर्धा नगर पालिकेला ४ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला. त्यानंतर वर्धा नगर पालिकेच्या आरोग्य विभागाची चमू नम्मा टॉयलेटच्या अवलोकनासाठी चेन्नईला गेली व तेथून पाहून आल्यानंतर शहरात ते लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यातून वर्धा शहरातील ५ ठिकाणी नम्मा टॉयलेट उभारले जाणार आहे. हे काम केंद्र सरकारची मान्यताप्राप्त असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची नम्मा संस्थाच करणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली.
तामिळनाडूत यशस्वी झाल्यानंतर राज्यात दाखल
नम्मा शौचालयाचे वैशिष्ट्य म्हणे हे युनिव्हर्सल डिझाईन, मॉड्युलर स्टॉल्स, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ऐसपैस जागेची उपलब्धता, स्वच्छतेसाठी मुबलक पाण्याची उपलब्धता, दुर्गंधीमुक्त वातावरणासाठी हवा खेळती राहणे, व सोलर एनर्जीवरून विद्युत व्यवस्था अशी आहेत. सुरूवातीला चेन्नई शहरात प्रायोगिक तत्वावर थांबरम नगर पालिकेने याचा वापर केला.व त्याच्या यशस्वी चाचणीनंतर तामिळनाडू सरकारने २०१३ मध्ये या मॉडेलला अधिकृत मान्यता दिली. आता हे मॉडेल राज्यात वर्धेत पहिल्यांदाच लावण्यात येणार आहे.
नम्मा म्हणजे काय?
तामिल भाषेत नम्मा म्हणजे मराठीत ‘माझे’ किंवा इंग्रजी ‘माय’ असा अर्थ आहे. त्या अर्थाने माझे शौचालय असा अर्थबोध होतो. तामिळनाडू सरकारने २०१२ मध्ये हागणदारी मुक्त राज्य करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची बैठक चेन्नई येथे घेतली होती. या तज्ज्ञांमध्ये अहमदाबाद, मुंबई येथील सदस्यांचा समावेश होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या शौचालयांचा अभ्यास करून तसेच तामिळनाडू राज्यातील त्रिची, उटी, कांचीपुरम, चेन्नई व अन्य शहरांचे तीन महिने सर्व्हेक्षण केले व आंतराष्ट्रीय मानकाचे शौचालय मॉडेल तयार केले. त्याला नम्मा हे नाव देण्यात आले.
वर्धा हे शहर महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे. या शहरात दररोज १ हजार पर्यटक देशविदेशातून येतात. स्वच्छतेचा सार्वजनिक आदर्श निर्माण व्हावा यासाठी वर्धा शहरात नम्मा शौचालय लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे कंत्राट ई-निविदेमार्फत देण्यात आले आहे. लवकरच शहरात हे शौचालय लावले जातील.
अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा