आंतरराष्ट्रीय जलतरणपटूची परिवारासह विश्वविक्रमाकडे कूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 01:06 PM2019-04-22T13:06:53+5:302019-04-22T13:08:36+5:30
धुर्वे परिवाराने मुंबई येथील एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतची १६ किलो मीटर अतंराची खाडी पार करून विश्वविक्रम नोंदविण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या २८ एप्रिलला सकाळी सात वाजता रिले पद्धतीने पोहून ते विक्रम नोंदविणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील कारंजा तालुक्याच्या उमरविहिरा या गावातील आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू सुखदेव धुर्वे हे नागपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सुखदेव हे जलतरणात पारंगत असून अनेक विक्रमही त्यांनी आपल्या नावे केले आहे. त्यांची पत्नी व दोन मुलांनाही पोहण्याचा छंद जडल्याने आता या धुर्वे परिवाराने मुंबई येथील एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतची १६ किलो मीटर अतंराची खाडी पार करून विश्वविक्रम नोंदविण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या २८ एप्रिलला सकाळी सात वाजता रिले पद्धतीने पोहून ते विक्रम नोंदविणार आहेत.
महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना मुंबई, पोर्ट ट्रस्ट व नौदल बल या सर्वांची रितसर परवानगी घेऊन स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट, मिहीर सेन स्विमींग अॅडव्हेंचर स्पोर्टिंग क्लब, नागपूर शहर पोलीस, व्हिक्टोरियस स्विमींग स्पोर्टिंग क्लब, डॉल्फिन स्विमींग क्लब, कामगार कल्याण स्विमींग पूल, रघोजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हे सागरी साहसी अभियान आयोजित केले आहे. या अभियानाकरिता लागणारा खर्च स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टकडून सुधीर दिवे आणि स्वत: जलतरणपटू सुखदेव धुर्वे करणार आहे. या अभियानात सुखदेव धुर्वे (४४) यांच्यासह त्यांची पत्नी वैशाली पांडे-धुर्वे (३८), मुलगा सार्थक (१८) व मुगली तन्वी (९) यांचा सहभाग आहे. या अभियानाची सुरुवात बोटमधून सूर मारून होणार आहे. एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया १६ कि.मी. खाडी रिले पद्धतीने पोहणारे आशिया खंडातील धुर्वे कुटुंब हे पहिलेच राहणार आहे. या अभियानाची नोंद घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर उपस्थित राहणार आहेत.
जलतरणपटूंना मिळणार बॅकअप
या सागरी साहसी अभियानात धुर्वे परिवारासोबत साई आणि माऊली अशा दोन बोट राहणार आहे. त्यातील एक बोट जलतरणपटूला सागरी मार्ग दाखविण्याकरिता व दुसरी बोट महाराष्ट्र संघटनेचे निरीक्षक व जलतरणपटूची काळजी घेण्यासाठी राहणार असून त्यामध्ये डॉ. नीलेश पांडे राहणार आहेत. सोबतच एक सेफ्टी बोटसुद्धा राहणार आहे. दोन्ही बोटचे नियंत्रण कुणाल कोहळी यांच्याकडे राहणार आहे. पेस स्विमर म्हणून सिद्धी अतुल तपासे राहणार आहे.
भविष्यात आर्वी परिसरातील जलतरणपटूंकरिता सुखदेव धुर्वे प्रेरणास्थान ठरेल. ते आता रविवारी एलिफंटा ते गेट ऑफ इंडिया हे १६ कि.मी.चे अंतर रिले पद्धतीने पार करणार आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील जलतरणपटूंना या अभियानात प्रत्यक्ष सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी आपली नावे स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टकडे नोंदवावी. तसेच रविवारी सकाळी ७ वाजता गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे पोहोचावे. त्यांच्याकरिता ट्रस्टद्वारे नौकाविहाराची व्यवस्था करण्यात येईल.
- सुधीर दिवे, मार्गदर्शक, स्व.वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्ट.
धुर्वे परिवाराचे योगदान
४आंतराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे हा कारंजा तालुक्यातील आदिवासीबहुल असलेल्या १६० लोकवस्तीच्या उमरविहिरा येथील आदिवासी युवक आहे. त्याने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गावाचे, जिल्ह्याचे व राज्याचा नावलौकिक केला आहे. त्यांना आतापर्यंत सारथी, विदर्भ गौरव, नवरत्न, बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे, राजा शिवछत्रपती अवॉर्ड व वीर बिरसा मुंडा क्रीडा पुरस्कार यासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यासोबतच पत्नी वैशाली पांडे, मुलगा सार्थक आणि मुलगी तन्वी जलतरणामध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत आहे. त्यामुळे आता या साहसवीर धुर्वे परिवाराच्या विक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.