पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 10:41 PM2022-09-24T22:41:01+5:302022-09-24T22:41:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वायगाव येथील एटीएम मशीन गॅस कटरने कापून त्यातील २३ लाख ७८ हजार ८०० रुपयांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वायगाव येथील एटीएम मशीन गॅस कटरने कापून त्यातील २३ लाख ७८ हजार ८०० रुपयांची रक्कम चोरणारे तसेच बोरगावात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या आंतरराज्यीय एटीएम चोरी करणाऱ्या टोळीचा वर्धा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश करून त्यांना तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथून २३ रोजी अटक केली.
पोलिसांनी अटक केलेल्यात साबीर लियाकत खान (२५), अन्सार सुले खान (२६) दोन्ही रा. घोरावली जि. पलवल, इरफान शकुर शेख (३७) रा. सौफना जि. पलवल, हाकाम शेर महम्मद शेख (२७) रा. बावला जि. नुहू सर्व रा. राज्य हरयाणा यांचा समावेश आहे.
चोरट्यांनी २९ ऑगस्ट रोजी चोरीच्या वाहनांचा वापर करून वायगाव येथील एसबीआय कंपनीचे एटीएम मशीन गॅस कटरने कापून तब्बल २३ लाख रुपयांची रक्कम चोरून नेली होती. तसेच बोरगावातही एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करून ते पसार झाले होते.
देवळी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या समांतर तपास करताना आरोपी तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जीवाची पर्वा न करता खेडला नुहू मेवात ढाब्यावर छापा मारून चारही आरोपींना अटक केली. चौघांना २४ रोजी न्यायालयात हजर केले असता २ ऑक्टोबर रोजीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलीस कोठडीदरम्यान आणखी काही गुन्ह्याची कबुली हे चोरटे पोलिसांना देतील अशी शक्यता वर्तविली जात असून पोलीसही त्यांना बोलके करूच असा विश्वास व्यक्त करीत आहे. या चोरट्यांनी राज्यातील इतर भागातही काही चोरीचे गुन्हे केले असावे असाही अंदाज पोलिसांना आहे. त्यादिशेनेही तपास केला जाणार असल्याचे सांगण्यात येते.
महिनाभर हरयाणात तळ... ‘ब्रेव्हो’ वर्धा पोलीस...
- मागील महिनाभरापासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांनी राजस्थान, मध्यप्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र राज्यात कसून तपास केला. आरोपी हे वेळाेवेळी आपले ठिकाण बदलत होते. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड व त्यांच्या चमूने तब्बल १५ दिवस आरोपींचा माग घेतला. इतकेच नव्हेतर देवळी पोलीस ठाण्याचे पथकही आरोपींच्या मागावर होते. आरोपींचा सुगावा लागताच त्यांच्या मुसक्या आवळण्यात अखेर एपीआय महेंद्र इंगळे, सलाम कुरेशी, हमीद शेख, गजानन लामसे, निरंजन वरभे, रणजित काकडे, सचिन इंगोले, नीलेश कट्टोजवार, चंदू बुरंगे, रितेश शर्मा, राजू जयसिंगपूरे, गोपाल बावनकर, कुणाल हिवसे, अमोल ढोबाळे, अक्षय राऊत, अनुप कावळे, मनीष कांबळे यांच्या प्रयत्नांना यश आले.
१० जणांच्या सशस्त्र टीमने केली धरपकड
- आरोपी निजामाबाद येथे असल्याची तांत्रिक माहिती मिळाली असता तत्काळ पोलीस पथक रवाना झाले.
- टोल नाक्यावरील सीसीटीव्ही तपासले असता एचआर ३० व्ही ४५२५ क्रमांकाची कार पास झाल्याचे समजले.
- असे असले तरी कार पुढील टोलनाक्यावरून पास न झाल्याने चोरटे निजामाबाद परिसरातच असल्याचे समजले.
- निजामाबाद पोलीस आणि वर्धा पोलीस अशा १० जणांच्या सशस्त्र टीमने टोईंग वाहनाचा वापर करून धाब्यांची रेकी केली.
- दरम्यान, दग्गी गावात असलेल्या खेडला नुहू मेवात नामक ढाब्यावर थांबलेले दिसले. पोलिसांनी ढाब्यावर छापा मारून दोन आरोपींना अटक केली.
- तर दोन आरोपी मागील बाजूच्या जंगलात पळाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांचीही धरपकड केली. सदाशिव नगर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
८ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल केला जप्त
- पोलिसांनी आरोपींकडून ८ हजार ५०० रुपये रोख, चार मोबाइल, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी फायटर, तीन एटीएम कार्ड, दिल्ली पासिंग वाहनांच्या दोन फेक नंबर प्लेट, वाहन डायरेक्ट करण्याची दोन हत्यारं, पांढऱ्या रंगाची कार असा एकूण ८ लाख ६९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असून आरोपींना देवळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
चोरीच्या पैशातून घेतली नवी कार
- आरोपींनी वायगावात चोरी केलेले पैसे घेऊन ते ज्या वाहनांतून जात होते. ते वाहन एका गावात उलटल्याने त्यांनी चोरीतील पैशातून नवी पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली होती. त्याच कारमधून हे सर्व आरोपी आपले ठिकाण वेळोवेळी बदलवत होते. एकूणच एटीएम कक्षातून रोकड पळविणाऱ्यांना ट्रेस करीत त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
आरोपी एटीएम कटिंग करणारे अट्टल गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र हरियाणा आदी राज्यांत गुन्हे केले आहेत. सध्या हे सर्व आरोपी दिल्ली, पानिपत येथील एटीएम कटिंगच्या गुन्ह्यात फरार आहेत. यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. चोरीतील रिकव्हरीसाठी पोलीस पथक रवाना होणार आहे. चोरीतील बऱ्यापैकी रक्कम रिकव्हर होण्याची शक्यता आहे.
-प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा.