उघाड मिळताच आंतरमशागतीला वेग
By Admin | Published: July 14, 2016 02:13 AM2016-07-14T02:13:44+5:302016-07-14T02:13:44+5:30
आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत होते.
शेतीकामांची लगबग : ३ लाख ५५ हजार ९१६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी
वर्धा : आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत होते. हा या हंगामातील पहिलाच दमदार पाऊस असल्याने पिकांच्या वाढीसाठी तो पोषकच आहे. पण पाऊस थांबतच नसलेल्या शेतकरी वर्गाला आंतरमशागतीचा प्रश्न सतावत होता. कालपासून काहीशी उघाड मिळताच आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे.
जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत होते. पुनर्वसू नक्षत्राच्या प्रारंभीच जिल्ह्यासह राज्यभरात दामदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी खरीपातील पिके अंकुरली. विशेष म्हणजे दुबार पेरणीचे संकट या पावसाने टळले. पण आठवडाभरापासून ठाण मांडलेला पाऊस उघाड केव्हा देतो याची वाट शेतकरी बघत होते. अतीपावसामुळेही साधलेली पिके नष्ट होण्याचीही भीती शेतकऱ्यांना होती. पण मंगळवारपासून पावसाने काहीशी उघाड दिली. त्यामुळे लगोलग शेतकरी आंतरमशागतीच्या कामांत गुंतला आहे. यामध्ये डवरणी, फवारणी, निंदन, खत टाकणे यासह इतरही कामांना वेग आला आहे. काही दिवस उघाड देऊन पाऊस यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. यासाठी गावागावांत मजूरवर्गाचा शोध सुरू आहे. तसेच फवारणीची औषधे व खतांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे.(शहर प्रतिनिधी)
पिकांच्या फवारणीलाही आला वेग
पिकांचे किटकांपासून रक्षण व्हावे, यासाठी फवारणी केली जाते. पाऊस थांबताच फवारणीला वेग आला आहे. आधीच अत्यल्प उत्पन्नामुळे गतवर्षी शेतकरी मेटाकुटीस आला होता. त्यामुळे यंदा त्यांना कुठलीही जोखीम घ्यावयाची नाही. त्यामुळे फवारणी सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिक पंपांमुळे आता फवारणी पूर्वीपेक्षा काहीशी सोपी झाली आहे. बरेच शेतकरीच आता स्वत:च्या शेतात फवारणी करून घेत आहेत.