पोलीसदादाने दिला प्रामाणिकतेचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:56 PM2019-03-19T23:56:38+5:302019-03-19T23:57:14+5:30
बसस्थानकावर पडलेली दागिने आणि इतर वस्तू असलेली पर्स महिलेने पोलीस शिपायाकडे आणून दिल्यानंतर त्यांनी शोध घेऊन संबंधिताला परत दिली. खार्की वर्दीतही माणुसकी दडलेली असते, याचाच दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी परिचय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बसस्थानकावर पडलेली दागिने आणि इतर वस्तू असलेली पर्स महिलेने पोलीस शिपायाकडे आणून दिल्यानंतर त्यांनी शोध घेऊन संबंधिताला परत दिली. खार्की वर्दीतही माणुसकी दडलेली असते, याचाच दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी परिचय दिला.
मंगळवारी सकाळी शुभांगी पंकज वंजारी रा. मांडवा या बुटीबोरी येथून वर्धा बसस्थानकावर आल्या. या दरम्यान त्यांची पर्स नकळत स्थानकाच्या आवारातच पडली. ही बस वाढवे नामक महिलेला मिळताच तिने ती पर्स देवळी पोलीस ठाण्यात कार्यरत नायक पोलीस शिपाई नीलेश सडमाके यांच्या सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासोबत चंद्रकांत काकडे हेसुद्धा उपस्थित होते. पर्स तपासली असता त्यात सोन्याचे दागिने आणि पैसे, मोबाईल व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. दोघांनी तपासकार्य सुरू करीत पर्समधील मोबाईलवर आलेल्या कॉलच्या आधारे महिलेशी संपर्क केला. तसेच पोलीस ठाण्यात येऊन पर्स घेऊन जाण्याबाबत कळविले. समाजाचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराळा आहे. मात्र, त्यांच्यातही प्रामाणिकता आणि सचोटी आहे. सदैव अतिरिक्त कामाचा ताण सांभाळून ते जनतेच्या रक्षणार्थ सज्ज असतात. एकाही वस्तूला स्पर्श न करता वंजारी यांना पर्स परत करण्यात आली.