बंधारा बांधकामाची चौकशी करा
By admin | Published: April 22, 2017 02:07 AM2017-04-22T02:07:25+5:302017-04-22T02:07:25+5:30
येथील नगरपंचायतला विकासकामासांठी पालकमंत्र्यांनी पाच कोटींचा निधी दिला. त्यामधून बाकळी नदीवरील बंधारा बांधकाम करण्यात येत आहे.
बांधकाम साहित्य निकृष्ट : खोदकामावर उधळपट्टी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप
आष्टी (शहीद) : येथील नगरपंचायतला विकासकामासांठी पालकमंत्र्यांनी पाच कोटींचा निधी दिला. त्यामधून बाकळी नदीवरील बंधारा बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी ७५ लक्ष रूपयांचा खर्च प्रस्तावित असताना बांधकामाचा पैसा खोदकामावर खर्च करून मुळ उद्देश बाजूला ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर बांधकामात वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ठ दर्जाचे असून चौकशीची मागणी आहे. येथील बांधकाम सद्य:स्थितीत बंद आहे.
बाकळी नदीवरील बंधारा बांधकाम लघुसिंचन जलसंधारण स्थानिक स्तर उपविभागाला दिले. या विभागाने सदर कामाची निविदा दिल्यावर नागपूर येथील एका कंस्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले. यात दोन्ही बाजूचे खोदकाम झपाट्याने पूर्ण करण्यात आले. याकरिता ४० लक्ष रूपयांचे देयक काढण्यात आल्याची माहिती आहे. खोदकामात अधिक रक्कम खर्ची झाली तर दुसरीकडे बंधारा बांधकाम रखडत ठेवण्यात आले. सदर काम सुरू केले तेव्हा नगरपंचायत याची कुठलीही माहिती देण्यात आली नाही. नदीच्या पात्राशेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांनाही विश्वासात घेतले नसल्याचे समजते. खोदकामासाठी अधिक तरतुद केल्याने लघुसिंचन जलसंधारण विभागाच्या कामाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बंधारा बांधकामकरीता लागणाऱ्या २० एमएम. गिट्टीऐवजी ६० एमएम गिट्टी वापरल्या जात आहे. रेतीऐवजी डस्टचा वापर होत आहे. सिमेंट अत्यल्प प्रमाणात वापरल्या जात आहे. बांधकाम साहित्य दर्जाचे न वापरता हलक्या पातळीचे वापरण्यात येत असल्याने हा बंधारा भविष्यात किती काळ टिकेल याविषयी नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहे.
लघुसिंचन जलसंधारण विभागाचे अभियंता या कामाकडे फिरकुनही पाहत नसल्याने कंत्राटदाराची मनमानी वाढली आहे. पावसाळ्याला काही महिन्यांचा अवधी असताना हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. शासनाच्या निधीचा वापर योग्य मार्गाने करीत नसल्यामुळे नगराध्यक्ष मीरा येनुरकर यांनी लघुसिंचन जलसंधारण विभागाला सदर कामाबाबत पत्र पाठविले आहे. यात अंदाजपत्रक तात्काळ सादर करावे, अभियंत्यांनी येवून बांधकामाबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
काँक्रीटचा दर्जा निकृष्ठ असल्याचा आरोप
बाकळी नदीच्या दोन्ही काठाचे अंतर जास्त असल्याने येथे मोठ्या बंधाऱ्याचे बांधकाम प्रस्तावित केले होते. यासाठी संपूर्ण बंधाऱ्याचे मोठ्या आकारात काँक्रीटीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र सदर काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असताना यावर देखरेख ठवेली जात नाही. यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे.
विजेचे खांबही हटविले
बाकळी नदीच्या काठावरून गणेशतिर्थापर्यंत वीज उभारणी केली होती. सदर विजेचे खांब हटविण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करताना गैरसोय होत आहे. गणेशतिर्थावर गणपती व दुर्गादेवी विसर्जन, उत्तरवाहिनीवर अस्थिविसर्जनासाठी नागरिक येतात. मात्र सदरचा रस्ता बंद करून येथील खांबही हटविल्याने नाग्रिकांची गैरसोय होत आहे.