शेतातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा देताहेत मृत्यूला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:12 PM2017-11-28T22:12:07+5:302017-11-28T22:12:28+5:30
कपाशी व तुरीच्या पिकांवर विद्युत खांबावरील जिवंत वीज तारा लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांसह कापूस वेचणाऱ्या मजुरांचा जीव धोक्यात सापडला आहे.
आॅनलाईन लोकमत
केळझर : कपाशी व तुरीच्या पिकांवर विद्युत खांबावरील जिवंत वीज तारा लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांसह कापूस वेचणाऱ्या मजुरांचा जीव धोक्यात सापडला आहे. याबाबत अनेकदा महावितरणकडे संबंधित शेतकऱ्याने तक्रारी केल्या; परंतु त्या तक्रारीची अधिकारी, कर्मचारी वर्गाने दखलच घेतली नाही. या जिवंत तारांचा करंट लागून एखाद्याचा जीव गेल्यानंतर महावितरणाला जाग येईल का? असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.
आमगाव (खडकी) येथील शेतकरी अमोल जांबुतकर यांचे मौजा आमगाव येथे शेत आहे. सध्या या शेतात कपाशी व तुरीचे पीक आहे. त्यांच्या शेतात विद्युत खांबावरील जिवंत वीज तारा लोंबकळून तुरीच्या झाडांना लागलेल्या आहे. हाताने पकडणे शक्य होईल इतक्या खाली या वीज तारा आल्या आहेत. शेतात सध्या कपाशी वेचाई सुरू असल्याने मजुरांचा जीव धोक्यात आला आहे. अनावधानाने जर एखाद्या मजुराच्या हाताचा स्पर्श या लोंबकळणाऱ्या जिवंत ताराला झाला तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच भीतीने शेतकऱ्यांसह शेतमजुरीही धास्तावले आहेत. नाल्यातील रसायनयुक्त पाण्याच्या प्रकरणी सेलूचे तहसीलदारांनी गावात भेटीदरम्यान पाहणी केली असता ग्रामस्थांनी ही बाब त्यांच्याही निदर्शनास आणून दिली, हे विशेष. तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अनुचित प्रकार घडण्याआधी याकडे लक्ष देत जांबुतकर यांच्या शेतातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांना सरळ करण्याची मागणी आमगावच्या ग्रामस्थांनी केली आहे. याकडे दुर्लक्ष करून एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी महावितरणवर राहील असे सांगण्यात आले आहे.
अनवधानाने स्पर्श झाल्यास अपघाताचा धोका
शेतात सध्या कपाशी वेचाई सुरू असल्याने मजुरांचा जीव धोक्यात आला आहे. अनावधानाने जर एखाद्या मजुराच्या हाताचा स्पर्श या लोंबकळणाऱ्या जिवंत ताराला झाला तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच भीतीने शेतकऱ्यांसह शेतमजुरीही धास्तावले आहेत. अनेकदा मजूर शेतात येण्यास धजावत नाही अशी व्यस्था शेतकरी मांडतात.