कंत्राट दिलेल्यांनाच बोलवा प्रचार करायला; कार्यकर्त्यांचा सूर
By admin | Published: October 6, 2014 11:16 PM2014-10-06T23:16:59+5:302014-10-06T23:16:59+5:30
आर्वी विधानसभा मतदार संघात अनेक कामे करण्यात आलीत़ ही कामे अनेक उमेदवारांनी घडवून आणली आहेत़ या कामांचे कंत्राट मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी फिल्डींग लावली होती; पण ती कामे भलत्याच
अनिल रिठे - तळेगाव (श्या़पं़)
आर्वी विधानसभा मतदार संघात अनेक कामे करण्यात आलीत़ ही कामे अनेक उमेदवारांनी घडवून आणली आहेत़ या कामांचे कंत्राट मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी फिल्डींग लावली होती; पण ती कामे भलत्याच कंत्राटदारांना देण्यात आली़ यामुळे सध्या मतदार संघातील कार्यकर्ते नाराज असून ज्यांना कंत्राट दिले, त्यांनाच प्रचारासाठी बोलवा, असा नाराच नाराज कार्यकर्ते देत असल्याचे दिसते़ यामुळे उमेदवारांची मात्र गोची झाली आहे़
मतदार संघातील तुरळक कंंत्राटदार वगळता अन्य मतदार संघ व अन्य जिल्ह्यातील कंत्राटदारांना आर्वी विधानसभा मतदार संघातील कामे देण्यात आली़ लहान-सहान कामेही कार्यकर्त्यांना देण्यात आली नाहीत़ यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते उमेदवारांवर नाराज असल्याचे दिसते़ प्रचारासाठी उमेदवारांचा फोन जाताच ज्यांना कामे दिलीत त्यांनाच प्रचाराला बोलवा, असे स्पष्ट शब्दात सुनावले जात आहे़ यामुळे उमेदवारांची पंचाईत झाली आहे़ हा प्रकार कुण्या एकाच उमेदवारासोबत घडतोय, अशातला भाग नाही तर रिंगणातील बहुतांश उमेदवारांना हे बोल ऐकावे लागत असल्याचे दिसून येत आहे़
दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला आता सुरूवात झाली आहे़ जाहीर सभा, रॅली, बैठकी आदींसाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहिजे असते़ उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन दिसायला हवे, यासाठी उमेदवारांचे निकटस्थ जीवाचे रान करताना दिसतात़ वॉर्ड, गाव प्रमुख, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सहकारी संस्थाचे संचालक, पदाधिकारी येथपासून सर्वच गर्दी जमविण्याच्या मागे लागले आहेत; पण दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे़ या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या वाट्याला पद, उमेदवारी येत नाही़ किमान लहान-मोठ्या कामांतून उत्पन्न मिळाले तर घर चालेल, अशी त्यांची अपेक्षा असते़ असे झाल्यास पक्षाला मदत करण्याची त्यांची मानसिकता असते; पण उमेदवारांना त्यांचा विसर पडत असल्याने ऐन निवडणुकीत अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते़ सध्या आर्वी मतदार संघात याचा अनुभव अनेकांना येताना दिसतो़