फळेच देताहेत अनेक आजारांना निमंत्रण
By admin | Published: April 12, 2015 01:56 AM2015-04-12T01:56:13+5:302015-04-12T01:56:13+5:30
उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलीत राखण्यासाठी डॉक्टर जलयुक्त फळे खाण्याचा सल्ला देतात.
वर्धा : उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलीत राखण्यासाठी डॉक्टर जलयुक्त फळे खाण्याचा सल्ला देतात. मात्र हल्ली फळे पिकविण्याच्या पद्धतीमुळे फळे खाणे आजाराला निमंत्रण देणारे ठरत आहे. अन्न व औषधी प्रशासनाने फळे पिकविण्यासाठी रासायनिक द्रव्यांचा उपयोग करणाऱ्याविरध्द दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे.
पोषक आहार म्हणून अनेकजण नियमित फळाचे सेवन करतात. पण या फळांचे सेवन करणे नागरिकांना विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरताना दिसते. काही विक्रेते नैसर्गिक फळ पिकविण्याच्या पध्दतीला फाटा देऊन फळे पिकविण्यासाठी घातक रसायनाचा सर्रास वापर करू लागले आहे. आंबा, केळी, चिक्कू व टरबूज आदी फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडसारख्या घातक रसायनाचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाईडमुळे अवघ्या २४ तासांत आंबे व केळी पिकविली जातात. पण ही फळे जीवितास तेवढीच घातक ठरू शकतात. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांना ही घातक फळे निमंत्रण देणारी ठरू शकतात. यामुळे पोटात आग होणे, चक्कर येणे, पोट बिघडणे, अशी दुखणे या फळ आहारामुळे होऊ शकतात. सगळीकडे रासायनिक प्रक्रिया केलेली फळे सर्रास विकली जात आहे. कच्ची फळे रसायनात बुडवून काही तास ठेवल्यास ही फळे पिवळी होतात. पण त्यात गोडवा राहत नाही. फळ विक्रेत्यांकडून मात्र ती ‘डायबटीक’केळी असल्याची बतावणी करून ग्राहकांना विकली जात असल्याची माहिती आहे. या बतावणीला ग्राहकही बळी पडत असल्याचे दिसते. पौष्टिक फळ म्हणून केळीला वर्षभर मागणी असते. दर कितीही वाढले तरीही केळीची विक्री हमखास होते. याप्रकारे रासायनिक फळांचा वापर करून फळे पिकविणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध विभागाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. याबाबत संबंधीत विभागाने दखल घेत कारवाई करून करण्याची मागणी आहे. नागरिकांत जागृती करण्याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)