दयालनगर येथे आयपीएलवर सट्टा
By admin | Published: May 23, 2017 01:03 AM2017-05-23T01:03:23+5:302017-05-23T01:03:23+5:30
दयालनगर परिसरात बुधराणी याच्या घरी क्रिकेट आयपीएलच्या फायनल मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.
एकाला अटक : १९ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दयालनगर परिसरात बुधराणी याच्या घरी क्रिकेट आयपीएलच्या फायनल मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी धाड मारून एकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून १९ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली.
पोलीस सुत्रानुसार, स्थानिक गुन्हेच्या पोलिसांना दयालनगर येथील महेश चांडरूमल बुधराणी हा त्याचे दयालनगर येथील घरी बसून सुरू असलेल्या आय.पी.एल. २०१७ च्या खेळल्या जात असलेल्य सन राईज पुणे (आर.पी.एस.) विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सुरू असलेल्या फायनल सामन्यावर लोकांकडून पैशाचा सौदा घेवून हारजितचा जुगार खेळवित आहे, अशी माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी जुगार रेड केला असता, महेश बुधराणी याच्या घरी धाड मारली असता महेश बुधराणी सन राईज पुणे (आर.पी.एस.) विरूद्ध मुंबई इंडियन्स या संघाच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यावर मोबाईलच्या साह्याने पैशाची शर्त घेवून सदर आकड्यांची नोंद एका कागदावर लिहून जुगार खेळत असल्याचे दिसून आले. यावरून त्याला रंगेहात पकडून त्याच्या जवळील चार मोबाईल, एक टीव्ही व इतर साहित्य असा १९ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. व अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पराग पोटे, परवेज खान, नरेंद्र डहाके, दिवाकर परिमळ, अमर लाखे, आनंद भस्मे, सचिन खैरकार, जगदिश डफ, ज्योत्स्रा शेळके यांनी केली.
यंदाच्या सत्रात अनेक घटना
आयपीलच्या यंदाच्या सत्रात वर्धेत क्रिकेट स्पर्धेदरम्यान जुगार खेळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.