खडकी-खंबीत-बेलोरा रस्ता बांधकामात गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 05:00 AM2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:10+5:30
आमदार केचे यांनी तत्काळ रस्ता कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या. अर्थसंकल्पीय बजेट २०१८-१९ अंतर्गत ५०/५४ मधून ७ कोटी रुपयांच्या रस्ता कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार रस्ता बांधकामाचे कंत्राट पुलगाव येथील चौरसिया कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तालुक्यातील खडकी, खंबीत, बेलोरापर्यंत १६ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीकरणासह डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्ता कामात मोठ्याप्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी आ. दादाराव केचे यांच्याकडे केली. आमदार केचे यांनी तत्काळ रस्ता कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या.
अर्थसंकल्पीय बजेट २०१८-१९ अंतर्गत ५०/५४ मधून ७ कोटी रुपयांच्या रस्ता कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार रस्ता बांधकामाचे कंत्राट पुलगाव येथील चौरसिया कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. पण, कंत्राटदाराने वर्ष उलटले तरीही कामास हात लावला नाही. याप्रकरणी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. नाली खोदकाम केल्यावर काळी माती रस्त्यावर टाकली. त्यानंतर डांबरीकरणाचे काम सुरू झाले. खाली डांबराचा कोट न मारता सरळ गिट्टी टाकण्यात आली. त्यावर अल्प डांबर टाकून चुरी टाकली. कंत्राटदाराने केलेले सदोष काम अवघ्या तीनच दिवसात उखडले. याप्रकरणी भाजपचे कार्यकर्ते राजेश ठाकरे यांनी ग्रामस्थांसह कामावर जाऊन कंत्राटदाराची कानउघाडणी केली. मात्र, बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचलेच नाही. संतप्त नागरिकांनी यासंदर्भात आमदार दादाराव केचे यांच्याकडे जात आपबीती कथन केली. आ. केचे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी डांबराअभावी उखडलेली गिट्टीचा थर पाहून आमदार केचेही अवाक् झाले. त्यांनी कार्यकारी अभियंता सुनील कुंभे यांना भ्रमणध्वनी करून कंत्राटदार चौरसिया यांची एजंसी ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना दिल्या. रस्ता कामाचा दर्जा तत्काळ सुधारावा, सर्व गिट्टी काढून पुन्हा नव्याने काम करावे. अंदाजपत्रकाप्रमाणे प्रतिचौरस मीटर ३ किलो डांबर टाकण्यात यावे, यासह विविध सूचना आ. केचे यांनी दिल्या. आमदार केचे यांनी रस्ता कामाची पाहणी केल्यामुळे या सदोष कामाची पोलखोल झाली आहे.
खडकी-खंबीत,बेलोरा रस्त्याच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. डांबराचा पत्ताच नाही. ठेकेदार मनमानी करीत आहे. याप्रकरणी वरिष्ठांना तक्रार केली आहे. दर्जा सुधारला नाही तर आंदोलन करणार.
-दादाराव केचे, आमदार, आर्वी
रस्त्याच्या गैरप्रकाराची तक्रार प्राप्त झाली आहे. चौरसिया कंस्ट्रक्शन कंपनीचे रस्ता कामात कुठेही लक्ष दिसत नाही. आ. केचे यांच्या सूचनेनुसार कन्स्ट्रक्शन कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावला असून दर्जा न सुधारल्यास काळया यादीत टाकण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविणार आहे.
- सुनील कुंभे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,आर्वी
गेल्या एक वर्षात १४ अपघात झाले. दोघांचा बळी गेला. आता काम सुरू झाले असून प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. याविरोधात बेमुदत उपोषण करण्यात येईल.
- राजेश ठाकरे, अंतोरा