पाटबंधारे विभागाचे कार्यालय जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:14+5:30
आष्टी तालुक्यातील मलकापूर तलाव, ममदापूर तलाव, कपिलेश्वर तलाव याचे नियोजन, देखभाल, संरक्षण, कालवे, पाटसऱ्या कामे, शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या पाणीवाटप संस्थेची कामे यासाठी वर्धा पाटबंधारे विभागाकडून १९९२ मध्ये आष्टीला सिंचन शाखेचे कार्यालय बांधण्यात आले होते. मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी दिवसागणिक अवस्था वाईट होत गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय पूर्णपणे जीर्ण झाले आहे. सद्यस्थितीत पाणी वापर संस्थेच्या वास्तूमधून या कार्यालयाचा कारभार सुरू आहे. नवीन कार्यालय मंजूर करून बांधकाम करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आष्टी तालुक्यातील मलकापूर तलाव, ममदापूर तलाव, कपिलेश्वर तलाव याचे नियोजन, देखभाल, संरक्षण, कालवे, पाटसऱ्या कामे, शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या पाणीवाटप संस्थेची कामे यासाठी वर्धा पाटबंधारे विभागाकडून १९९२ मध्ये आष्टीला सिंचन शाखेचे कार्यालय बांधण्यात आले होते. मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी दिवसागणिक अवस्था वाईट होत गेली.
या कार्यालयामध्ये बिनतारी संदेश केंद्र, कृषी विभागाचे जलक्षेत्र सुधार प्रकल्पाअंतर्गत कृषी विज्ञान मंडळ हे उपक्रमसुद्धा याच कार्यालयात राबविण्यात आले आहे. काळाच्या ओघात कर्मचारी कमी होत गेले. त्यामुळे सध्या अवघ्या दोनच कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कारभार हाकणे सुरू आहे.
पाच वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने हरितक्रांती पाणी वापर संस्था कार्यालय बांधून दिले. शेतकऱ्यांसाठी असलेल्या या कार्यालयाचा ताबा पाटबंधारे सिंचन शाखेने घेऊन एकप्रकारची उपेक्षाच केली आहे. त्यामुळे कार्यालय कुलूपबंद आहे. शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविते.
मात्र, यंत्रणा नसल्याने बोळवण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तत्काळ नवीन कार्यालय देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
पाटबंधारे कार्यालयाला ग्रहण
पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची कित्येक वर्षांपासून जीर्णावस्था असल्याने सद्यस्थितीत पाणी वापर संस्थेच्या कार्यालयातून कामकाज सुरू आहे. यातच अपुरा कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे या कार्यालयाला ग्रहण लागल्याचे चित्र आहे.
नविन कार्यालयासाठी निधीचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. निधी प्राप्त होताच बांधकाम सुरू करण्यात येईल. सद्यस्थितीत पाणीवापर संस्थेच्या इमारतीमध्ये कामकाज सुरू आहे.
- एम.बी. मानकर, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, आर्वी.