कोरडवाहू शेतीला मिळाला सिंचनाचा मार्ग
By admin | Published: July 8, 2015 02:11 AM2015-07-08T02:11:48+5:302015-07-08T02:11:48+5:30
पिण्याच्या पाण्याची कायम टंचाई असलेल्या मदनी या गावात जलयुक्त शिवार अभियानामुळे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे.
जलयुक्त शिवार अभियान : मदनी गाव झाले सुजलाम; सिंचन क्षमतेत वाढ
वर्धा : पिण्याच्या पाण्याची कायम टंचाई असलेल्या मदनी या गावात जलयुक्त शिवार अभियानामुळे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. नाल्यावर बांधलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यामुळे केवळ गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर शिवारातील शेतीला शाश्वत सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. पावसाच्या दडीमुळे पिकांना आवश्यक पाणी मदनीचे (आमगाव) तुषार सिंचनाद्वारे देत आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे कोरडवाहू जमिनीला शाश्वत सिंचनाचा मार्ग मिळाला आहे.
सात किमीवर असलेल्या बोरखेडी धरणावर अवलंबून राहावे लागत असलेल्या ग्रामस्थांना या अभियानातून गाव सुजलाम सुफलाम करण्याची नवी दिशा मिळाली. यामुळे ग्रामस्थांत चैतन्य व उत्साहाचे वातावरण आहे. जलयुक्त शिवारच्या अंमलबजावणीने भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात ७४ शेततळी, मृदासंवर्धन, १२ हजार ३६० हेक्टर क्षेत्रावर ढाळीचे बांध, ७७ बंधारे, ९७ किमी नाला खोलीकरण आदी कामे करण्यात आली.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मदनी गावात कोरडवाहू शेती अभियानाच्या माध्यमातून १२ लाख ८७ हजार व ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या खर्चाचे एकूण दोन सिमेंट बंधारे उभारण्यात आले. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन आजूबाजच्या शेतीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. या दोन्ही बंधाऱ्यात अनुक्रमे १३.०५ टीसीएम व ९.०१ टीसीएम पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावात सध्या पाणी असल्याने ग्रामस्थांत समाधान दिसते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांबाबत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी जिल्ह्यात एकूण २१४ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शेतकऱ्यांसह गावातील ग्रामस्थांनाही फायदा होत आहे. भूजल विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. मदनीसारख्या टंचाई घोषित गावात सिमेंट बंधारा बांधलयाने एकूण २२.०६ टीसीएम पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे. जलशोषक खड्डे, वनतळे, पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करून जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मदनी येथे जि.प. शाळेत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सलील बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी केतन पाठक, अतिरक्त जिल्हाधिकारी संजय भागवत, उपवनसंरक्षक मुकेश गणात्रा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूर-अमरावती विभागाचे संचालक मोहन राठोड, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील, तालुका उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नाडे, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक नितीन महाजन आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महाजन यांनी वर्धा पॅटर्नची माहिती देत पाण्याच्या स्त्रोत बळकटीकणासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. बऱ्हाटे यांनीही जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाची उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
७४ शेततळी, ७७ बंधाऱ्यांसह ९७ किमीपर्यंत नाल्याचे खोलीकरण
जिल्ह्यात ढाळीचे बांध १२ हजार ३६० हेक्टर क्षेत्रावरील कामे पूर्ण झाली आहेत. प्रती हेक्टर ०.४६ टीसीएमप्रमाणे हंगामात पाच वेळा बांधामध्ये पाणी भरल्याने २० टीसीएम पाणी उपलब्ध होते. त्याप्रमाणे २४ हजार ७२० टीसीएम पाणीसाठा भूगर्भात वाढतो आहे.
एक हेक्टर क्षेत्रातून एक मिमी मातीचा थर वाहून गेल्यास दहा ते बारा मेट्रिक टन माती वाहून जाते. ढाळीच्या बांधामुळे पाणी व मातीचे संधारण होते. जिल्ह्यात सिमेंट ३४ नाला बांध, २५ वनतळे, १८ दगडी बांध असे ७७ बंधारे पूर्ण झालेत. प्रती बंधारा आठ ते बारा टीसीएम याप्रमाणे ७७ बंधाऱ्यांतून ६९६ टीसीएम पाणी साठविले जाते. बंधाऱ्यालगतच्या विहिरींच्या पाणी पातळीत व सिंचन क्षमतेत वाढ होण्यास मदत होत आहे. ४८७ नाला खोलीकरणाची कामे पूर्ण झाली आहे. २०० मीटर लांबी प्रमाणे ९७ हजार ४०० मीटर म्हणजे ९७.४ किमी नाला खोलीकरणाचे काम पूर्ण केले. यातून ३ हजार ८९६ टीसीएम जलसाठा निर्माण झाला. हंगामात किमान पाच वेळा नाला खोलीकरणात पाणी भरल्यास व जिरल्यास १९ हजार ४८० मीटर पाणी भूगर्भात जिरविले जाईल. ७४ शेततळे पूर्ण झाली असून पिकांना संरक्षित पाणी देण्यास वापर केला जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.