कागदावरच होते सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 11:30 PM2017-08-29T23:30:12+5:302017-08-29T23:30:52+5:30
प्रशासनाने सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने १९८४ मध्ये दहेगाव (गोंडी) येथे तलावाची निर्मिती केली; पण सिंचनाचा मुख्य उद्देश कागदावरच राहिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रशासनाने सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने १९८४ मध्ये दहेगाव (गोंडी) येथे तलावाची निर्मिती केली; पण सिंचनाचा मुख्य उद्देश कागदावरच राहिला आहे. या तलावातील एक थेंबही पाणी सिंचनाकरिता वापरले जात नाही, हे वास्तव आहे. पाहणीमध्ये तलावाच्या पाटचºया पूर्णत: बुजल्याचे तथा पाणी सोडण्यासाठी कुणीही येत नसल्याचे उघड झाले.
आर्वी उपविभागाचे अधिकारी मुख्यालयी राहत नाही. यामुळे तलावांची स्थिती अत्यंत दयनिय झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून दहेगाव गोंडी तलावाची पाहणी करण्यासाठी कुठलाही अधिकारी आलेला नसल्याची माहिती शेतकºयांनी दिली. तलावाचे पाणी शेतीला मिळतच नसल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. केवळ गुरांना पिण्याकरिता पाण्याची सोय या तलावामुळे झाली आहे. तलावातून काढलेला कालवा पूर्णत: बुजलेला आहे. यामुळे शेतांपर्यंत पाणीच पोहोचत नाही. तलावाच्या भिंतीलगत विहीर आहे. यावर व्हॉल्हव बसविण्यात आला आहे. शेतकºयांसाठी पाणी सोडता यावे म्हणून तो व्हॉल्व्ह लावला आहे. सिंचन विभागाचा कर्मचारी तो व्हॉल्व्ह सुरू करून पाणी सोडेल, असा उद्देश होता; पण पाहणीमध्ये चार-पाच वर्षांपासून कुणी व्हॉल्व्हला हातच लावला नसावा, असे दिसते.
तलावाची भिंत सध्या जंगल असल्याचाच भास होत आहे. लोखंडाच्या पायºयांवर झुडपांचे साम्राज्य आहे. शिवाय परिसरातील मातीही घसरली आहे. तलावाची भिंत पावसाच्या पाण्यामुळे खचत असल्याचे दिसते. या तलावाने १०० टक्के जलपातळी गाठल्यास दहेगाव (गोंडी) गाव धोक्यात येऊ शकते. याबाबत आर्वी लघु पाटबंधारे विभागाला कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. तसेच या जलाशयातील पाणी सिंचनासाठी शेतकºयांना देण्याची मागणी आहे.
दहेगाव (गोंडी) तलाव धोकादायक
मागील कित्येक वर्षांपासून दहेगाव (गोंडी) तलावाची देखभाल दुरूस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे सद्यास्थितीत हा तलाव धोकादायक ठरत आहे. याबाबत तज्ञांना विचारणा केली असता तलावाची दुरूस्ती आता शक्य नाही. तलाव निर्मितीसाठी जेवढा खर्च लागला होता, तेवढाच खर्च आता दुरूस्तीसाठी करावा लागणार असल्याचे सांगण्यात येते. तलावाच्या मुख्य भिंतीची माती आता खचू लागली असून ही बाब गंभीर आहे.