किराणा दुकान म्हणजे नशापाणी करण्याचे ठिकाण आहे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 05:00 AM2022-02-16T05:00:00+5:302022-02-16T05:00:25+5:30
राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मद्यावरील शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले होते. दुकानात यासाठी एक शोकेस बनवून वाईन विक्री करण्यास सांगितले.
राजेश सोळंकी
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : आता किराणा दुकानात वाईन मिळणार असल्याने शौकीनांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. मात्र, याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मद्यावरील शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले होते. दुकानात यासाठी एक शोकेस बनवून वाईन विक्री करण्यास सांगितले. महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकान, मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेताना शेतकऱ्यांचे अर्थकारण बळावेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, किराणा दुकान म्हणजे नशापाण्याचे ठिकाण नव्हे, असा सूर आता उमटू लागला आहे.
बदनामीच जास्त ...
- व्हिस्की असो की बियर, वाईन म्हणजे दारु नव्हे का, असा प्रश्न निर्माण झाला असून, किराणा दुकानात साहित्यापेक्षा दारू विक्रीसाठी जास्त प्रसिद्ध होईल. त्यामुळे किराणा दुकानाची बदनामी जास्त होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.
अध्यादेश निघालाच नाही
- किराणा दुकाने आणि मॉल्समध्ये वाईन विक्रीची परवानगी दिली. यासाठी विरोध दर्शविण्यात आला आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. मात्र, तूर्त याविषयी महाविकास आघाडी सरकारने ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. दैनंदिन दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. अध्यादेश अद्याप निघाला नसल्याची माहिती आहे.
किराणा दुकानात वाईन विक्री नकोच
किराणा दुकानात वाईन मिळणार, हे जरी सत्य असले तरी त्याचे काही नोर्मस आहेत, त्यातच वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे येथे वाईन विक्रीचा प्रश्न उद्भवणार नाही. तशा गाईडलाईन वाचण्यातही आल्या नाहीत.
- अनिल लालवाणी, किराणा व्यावसायिक.
दुकानात वाईन विक्री करावी की, इतर किराणा साहित्याची विक्री करावी, आता विचार करावा लागेल. मात्र, वाईन विक्री किराणा दुकानात तरी नकोच. दुकानात सर्व प्रकारचे ग्राहक येतात. त्यामुळे याचा परिणाम लहान मुले, महिलांवर होण्याची शक्यता आहे.
- राजेंद्र बावनकर, किराणा व्यावसायिक