स्वयंरोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारीचा प्रश्न सुटेल
By admin | Published: March 23, 2017 12:51 AM2017-03-23T00:51:51+5:302017-03-23T00:51:51+5:30
युवक युवतींनी व गावकऱ्यांनी ग्रामविकासाच्या विविध कार्यक्रमात आपला सक्रीय सहभाग घेऊन आपलं गाव कस आदर्श होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
हेमचंद्र वैद्य : युवा आदर्श ग्रामविकास कार्यक्रम
आर्र्वी : युवक युवतींनी व गावकऱ्यांनी ग्रामविकासाच्या विविध कार्यक्रमात आपला सक्रीय सहभाग घेऊन आपलं गाव कस आदर्श होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सुटू शकेल. तसेच पाण्याचे योग्य नियोजन व वापर केल्यास बारमाही शेती करून शेतकऱ्यांना मोलाची मदत होवू शकते, असे मत डॉ. हेमंचद्र वैद्य यांनी केले. नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजित युवा आदर्श ग्राम विकास कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी ते बोलत होते.
युवा आदर्श ग्राम विकास कार्यक्रमांतर्गत पिपंळगाव भोसले ता. आर्वी हे गाव दत्तक घेण्यात आले. येथील युवक युवती व महिलांसाठी पाच दिवसीय शिबिराचे आयोजन स्थानिक धरणग्रस्त बहुउद्देशीय युवा मंडळ, पिंपळगाव यांच्या सहयोगाने करण्यात आले आहे.
अध्यक्षस्थानी आर्वी पंचायत समितीच्या सभापती शिला पवार उपस्थित होत्या. तसेच जिल्हा युवा समन्वयक संजय माटे, पिंपळगावच्या ग्रामपंचायत सदस्य सुचिता राऊत, अतुल कातरकर, अनुलोम प्रकल्प समन्वयक महेंद्र शिंदे, ग्रामसेवक, पोलीस पाटील गणपत इंगोले व धरणग्रस्त बहउद्देशीय युवा मंडळ, पिंपळगाव ता. आर्वीचे सचिव सतिश इंगोले उपस्थित होते.
संजय माटे युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, युवक युवतींना या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामविकासात जाडून त्यांना विकासाच्या मुख्य धाराप्रवाहात जोडण्याचा हा प्रयत्न आहे. या माध्यमातून विविध शासकीय योजना गावामध्ये राबविल्या जातील. गाव संपूर्ण हागणदारी मुक्त व्हावे, कॅशलेश व्यवहार व्हावेत व तरुणांना कौशल्य विकसाचं प्रशिक्षण देवून त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास मदत करणे, तसेच पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्याचे योग्य नियोजन करणे अशा विविध संकल्पना गावात राबविण्याचा मानस आहे.
प्रास्ताविक धरणग्रस्त बहुउद्देशिय युवा मंडळाचे सचिव सतीश इंगोले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुरज राऊत यांनी केले तर आभार विलास राऊत यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)