'साहित्य संमेलन भरविणे हे सरकारचे काम नाही'; अध्यक्षांनी पाठही थोपटली, दणकाही दिला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2023 06:47 PM2023-02-03T18:47:17+5:302023-02-03T18:47:48+5:30
Wardha News साहित्य संमेलने आयोजित करणे ही सरकारची जबाबदारी नाही. स्वायत्त संस्थांच्या माध्यमातूनच संमेलनाचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी करून सरकारची पाठही थोपटली अन् दणकाही दिला.
आनंद इंगोले
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी (वर्धा) : बेळगावसारख्या सीमावर्ती भागामध्ये मायमराठीला समृद्ध करण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे; परंतु साहित्य संमेलने आयोजित करणे ही सरकारची जबाबदारी नाही. स्वायत्त संस्थांच्या माध्यमातूनच संमेलनाचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी करून सरकारची पाठही थोपटली अन् दणकाही दिला.
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तत्पूर्वी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. संमेलनस्थळी ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून थोडक्यात मनोगत व्यक्त करताना न्या. चपळगावकर बोलत होते. ‘साहित्य संमेलनाबाबत सरकारनेही पथ्ये पाळली पाहिजेत; तरच त्याची प्रतिष्ठा वाढेल, असे सांगताना या व्यासपीठावर हिंदी साहित्यिकांनाही निमंत्रित केल्याबद्दल संमेलनाध्यक्षांनी आयोजकांचे कौतुक केले. तसेच हिंदी-मराठी हे एकमेकांचे साहित्य वाचल्याशिवाय आपण खुजे राहू, असेही ते म्हणाले. संमेलनाध्यक्षांच्या भाषणापूर्वी मावळते अध्यक्ष भारत सासने यांनी गेल्या साहित्य संमेलनाच्या भाषणाचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्रातील माणसांना साहित्य व संस्कृतीची भूक आहे. त्यांना काही बोलायचं आहे, त्यांना काही लिहायचं आहे; पण ते कुठं तरी कुंठत आहे. अशांना आधार देण्याचे काम, त्यांमध्ये आशावाद तेवत ठेवण्याचे काम आपल्याला करायचं आहे. सत्य हे अवध्य असतं, गांधीजींसारखं. उद्वेग आणि उन्माद समाजाला घातक असून साहित्यिकांनाही गांधीजींच्या भूमिकेकडे यावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शब्द नसते तर जीवन अंधकारमय असते : विश्वनाथप्रसाद तिवारी
रामायण, महाभारताने पूर्ण देशाला एका सूत्रात बांधले. भाषा हा जीवनातील महत्त्वाचा आविष्कार आहे. मनुष्याला रूप परमेश्वराने दिले; पण नाव माणसाने दिले आहे. या माणसाला पशूपासून अलग करण्याचं काम भाषा करीत असते. या भाषेला शब्दांमुळे समृद्धता येते. जर शब्द नसते तर आपले जीवनच अंधकारमय झाले असते, असे मत हिंदी साहित्यिक विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी व्यक्त केले.
...तर संमेलनाचे स्वरूप काही वेगळेच असते : प्रदीप दाते
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने वर्धानगरीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांची इच्छा होती. त्यामुळेच आम्ही सर्व तयारीला लागलो. आज साहित्यनगरीत अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे; पण ते आपल्यात नाहीत, याचे दु:ख आहे. ते आज असते तर या संमेलनाचे स्वरूप काही वेगळेच असते, असे मत कार्यवाह प्रदीप दाते यांनी व्यक्त केले. साहित्य साहित्यिकांपर्यंतच मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोहोचावे, यासाठी संमेलनाचे हे आयोजन असून ते चिरस्मरणीय ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तीर्थस्थळी येऊन स्वागत करण्याचं भाग्य लाभलं : उषा तांबे
वर्धा हे स्वातंत्र्यसैनिकांचे तीर्थस्थळ असून या ठिकाणी आयोजित साहित्य संमेलनाच्या भूमीलाही ‘महात्मा गांधी साहित्यनगरी’ व ‘आचार्य विनोबा भावे सभा मंडप’ असे नामकरण करण्यात आले. या तीर्थस्थळावर येऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्याचा मान मिळाला, हे भाग्यच आहे, असे मत अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी व्यक्त केले. तसेच शासनाने या संमेलनाकरिता दोन कोटींचा प्रचंड निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शासनाने आभारही मानले.