जिल्ह्यात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची जबाबदारी माझी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 06:41 PM2020-04-01T18:41:00+5:302020-04-01T18:43:34+5:30
वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देऊन पालकमंत्री सुनील केदार यांनी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सदर सूचना सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना दिल्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची जबाबदारी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी आहे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत पण ते शिधा मिळण्यास पात्र आहेत, आणि ज्यांच्याकडे शिधा पत्रिका आहेत मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना शिधा मिळत नाही अशा सर्वांची गाव, नगरपंचायत आणि नगरपरिषदनिहाय तात्काळ यादी तयार करुन त्यांना कार्ड वितरित करण्याचे आदेश पालकमंत्री सुनील केदार यांनी आज दिलेत.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देऊन त्यांनी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सदर सूचना सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना दिल्यात.
कोरोना संसगार्मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय , कामे बंद आहेत. अशा परिस्थितीत गरीब, मजूर, कामगार, छोटे दुकानदार, स्टॉल धारक ज्यांचा उदरनिर्वाह रोजच्या रोजंदारीवर चालतो त्या सर्वांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. त्यासाठी गाव निहाय शिधा पत्रिका धारकांची यादी करताना गावातील शिधापत्रिका धारकांची संख्या, शिधा मिळणारे आणि न मिळणारे, तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिकाच नाही मात्र ते शिधा मिळण्यास पात्र आहेत, आणि रेशनकार्ड आहे मात्र तांत्रिक कारणामुळे ज्यांना शिधा मिळत नाही, तसेच शिधा मिळण्यास अपात्र असणारे रेशनकार्ड धारक अशी विभागणी करून यादी दोन दिवसात तयार करण्यास त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. ज्यांच्याकडे कार्ड आहे आणि रेशन मिळत आहे अशांचा जास्त प्रश्न नाही मात्र ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांना तातडीने रेशनकार्ड तयार करून देण्याच्या सूचना केदार यांनी यावेळी दिल्यात.
उन्हाळा सुरू झाला असून या काळात ग्रामपंचायत, नगरपंचायत यांच्याकडे वीज देयक भरण्यास निधी नसल्यास अशा परिस्थितीत कोणत्याही गावातील, शहरातील पाणी पुरवठा योजनेचे वीज देयक न भरल्यामुळे वीज कनेक्शन कापण्यात येऊ नये.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात औषधाचा पुरेसा साठा करावा. औषधें उपलब्ध नसेल तर तात्काळ जिल्हा परिषदेने उपलब्ध करून देण्याचा सूचनाही त्यांनी दिल्यात. यावेळी त्यांनी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याबद्दल समाधान व्यक्त करून सर्व सरकारी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सहाययक आणि आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचा-यांच्या कामाचे कौतुक केले. आज खाजगी डॉक्टर त्यांचे दवाखाने बंद करून बसलेले असताना आपले डॉक्टर सैनिकांसारखे युद्धभूमीवर आघाडी सांभाळत आहेत याबद्दल त्यांनी सर्व डॉक्टरांचे आभारही मानले.
यावेळी, आमदार दादाराव केचे, रणजित कांबळे, पंकज भोयर खासदार रामदास तडस, अमर काळे, त्या त्या तालुक्याच्या आढावा बैठकीत उपस्थित होते . तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक बसवराज तेली आणि इतर अधिकारी उपस्थित होते.