बाळाच्या काळजीने बालमृत्यूवर आळा घालणे शक्य
By admin | Published: December 4, 2015 02:23 AM2015-12-04T02:23:21+5:302015-12-04T02:23:21+5:30
बालकांच्या आजाराला, बालमृत्यूला आळा घालावयाचा असेल तर बालक सुदृढ राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी नवजात शिशूची काळजी घेणे आवश्यक आहे.
अभ्युदय मेघे : नवजात शिशू सप्ताहात जनजागृतीपर कार्यक्रम
वर्धा : बालकांच्या आजाराला, बालमृत्यूला आळा घालावयाचा असेल तर बालक सुदृढ राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी नवजात शिशूची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, बालक सुदृढ असेल तर कुटुंब व देश सुदृढ राहील, असे मत दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे यांनी व्यक्त केले.
राधिकाबाई मेघे स्मृती परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाद्वारे आयोजित नवजात शिशू सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या सप्ताहानिमित्त परिचारिका, महाविद्यालयाचा बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग व सामाजिक परिचर्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य विनोबा भावे रुगणालयाच्या बाह्यरुग्ण विभागात आयोजित कार्यक्रमालामुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.सी. गोयल, औषधीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय दिवान, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमर ताकसांडे, नर्सिंग समन्वयक मनीषा मेघे, प्राचार्य बी.डी. कुलकर्णी, प्राचार्य बेबी गोयल, नर्सिंग संचालक सिस्टर टेसी सॅबास्टियन, अधिष्ठाता वैशाली ताकसांडे, अख्तरी शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात नवजात शिशूची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉ. तुषार जगझापे, डॉ. शिल्पी गायधने यांनी मार्गदर्शन केले. यानंतर एम.एस.सी. नर्सिंग, पी.बी.बी.एस. सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. या सप्ताहात प्रसूती विभाग, बालरोग विभाग येथे कार्यरत परिचारिका, गरोदर व बाळंतमातांसाठी विशेष व्याख्याने, आरोग्य शिक्षण, नाटिका असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय देवळी आरोग्य केंद्रात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष शर्मा, नाक, कान व घसारोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी हात धुणे, तापमान व्यवस्थापन, स्तनपान, डोळे, कातडी आणि नाळ याची काळजी, लसीकरण, धोक्याची लक्षणे आदींबाबत बालपरिचर्या विभाग प्रमुख अर्चना मौर्या, दीपलता मेंढे, बिबीन कुरियन, अर्चना तेलतुंबडे, मंजुषा महाकाळकर, अर्चना ताकसांडे, शालिनी मून, खुशबू मेश्राम, मीनल डंभारे, अरुंधती दगडकर यांनी प्रात्यक्षिक दिले. या संपूर्ण कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)