पावसाळा लागला; पण रस्त्यांची कामे अद्यापही प्रलंबित
By admin | Published: June 24, 2014 12:02 AM2014-06-24T00:02:15+5:302014-06-24T00:02:15+5:30
परिसरातील रस्त्यांची बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे दुरवस्था झाली आहे़ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांत वाढ झाली आहे़ पावसाळा सुरू झाला असताना परिसरातील रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवण्यात आलीत़
मोझरी (शे़) : परिसरातील रस्त्यांची बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे दुरवस्था झाली आहे़ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांत वाढ झाली आहे़ पावसाळा सुरू झाला असताना परिसरातील रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवण्यात आलीत़ यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे़ याकडे लक्ष देत किमान रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे़
मोझरी-कानगाव या सात किमी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे़ अनेक दिवसांपासून याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर चार पुलांपैकी एका पुलावर ऐन मध्यभागी खड्डे पडले आहे़ यातून सळाखी बाहेर निघून वर्तुळाकार खड्डे तयार झालेत़ हा प्रकार झाकण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने त्यावर माती टाकून खड्डे बुजविले; पण पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे़ यात अनेकांना वाहने घसरल्याने अपघाताला सामोरे जावे लागले़ या पुलाची अद्यापही दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ उर्वरित तीन पुलांवर मधोमध भगदाडे पडलीत़ बांधकाम विभाग यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसते़ मोझरी-खानगाव-आंबोडा या १० किमी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचेच साम्राज्य आहे़ यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे़
स्वातंत्र्याची ६६ वर्षे लोटूनही मोझरी-कापशी या सहा किमी रस्त्याचे अद्यापही मजबुतीकरण व डांबरीकरण पूर्णत्वास गेलेले नाही़ मोझरी-पोटी या तीन किमी रस्त्यावर सर्वत्र खड्डेचे खड्डे आहेत. मोझरी-कोसुर्ला या चार किमी रस्त्याचे डांबर पूर्णत: उखडले आहे; पण अद्याप रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ कंत्राटदार केवळ संबंधित कामे पार पाडून आपले देयके काढून मोकळे होत असल्याचे दिसते़ दर्जाहीन कामांमुळे अल्पावधीत खराब होणाऱ्या रस्त्याने प्रवास करताना वाहन धारक व सामान्यांना त्रास सहन करावा लागतो़ वर्धा ते राळेगाव या राज्यमार्गावरील पाथरी चौरस्ता ते कापशी या १३ किमी रस्त्याचे अद्यापही रुंदीकरण करण्यात आले नाही़ यामुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे़ वाढती रहदारी लक्षात घेता कानगाव-मोझरी रस्त्याचेही रुंदीकरण करणे गरजेचे झाले आहे़
सार्वजनिक व जि़प़ बांधकाम विभागाचे मात्र या ग्रामीण रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे़ परिसरातील रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे़(वार्ताहर)