सर्वसामान्यांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:00 AM2019-08-10T00:00:07+5:302019-08-10T00:00:33+5:30
अनेक वर्षांपासून लाल नाला आणि पोथरा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे पट्टे देण्याचे काम रखडले होते. ते काम आज पूर्ण झाले आहे. याचा जास्त आनंद आहे. सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे प्रतिपादन राज्याचे उर्जामंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : अनेक वर्षांपासून लाल नाला आणि पोथरा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे पट्टे देण्याचे काम रखडले होते. ते काम आज पूर्ण झाले आहे. याचा जास्त आनंद आहे. सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे प्रतिपादन राज्याचे उर्जामंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. समुद्रपूर येथे धनादेश व भूखंड वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आ. समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांची उपस्थिती होती.
ना. बावनकुळे पुढे म्हणाले, पूर्वीच्या सरकारने केवळ आश्वासने दिलीत. मात्र या सरकारने प्रकल्पग्रस्तांचा हा प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले. यासाठी आ. समीर कुणावार यांचा सिंहाचा वाटा राहिला. शासनाने सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री उज्ज्वला, सौभाग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी काम केले आहे. या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजेत. सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचे काम आमदार करीत असतात. एका परीने ते जनतेची वकिलीच करीत असतात. महाराष्ट्राच्या सर्व आमदारांमध्ये चांगले काम करणाऱ्या पहिल्या दहा आमदारांमध्ये आ. कुणावार यांचा क्रमांक लागतो असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
वर्धा हा दारूबंदी असलेला जिल्हा आहे. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते. या जिल्ह्यातील संपूर्ण मद्य विक्री बंद करण्यासाठी नागरिकांनी एस.एम.एस. द्वारे त्याची माहिती देण्याचे आवाहन यावेळी ना. बावनकुळे यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमादरम्यान लाल नाला आणि पोथरा या प्रकल्पातील उसेगाव तळोदी, निंभा, खापरी, रुणका, झुणका, बर्फा, सायगव्हाण व सुकळी या गावातील ३६१ लाभार्थ्यांना पुनर्वसित गावठाणातील भोगावटदार १ चे पट्टे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा ४१ गरजुंना लाभ देण्यात आला. तसेच अंत्योदय, प्राधान्य गटातील शिधापत्रिका वाटप आणि विविध योजनेतून लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
पोहणा आरोग्य केंद्राचा पालकमंत्र्यांनी केला श्रीगणेशा
हिंगणघाट : गावांमध्ये मोठे रुग्णालय नाही याची जाणीव ठेवून शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र हे नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देईल याची काळजी घेतली आहे. आता येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी येणारा प्रत्येक रुग्ण हा आपल्याच कुटुंबातील सदस्य आहे असे समजून त्यांना तशी वागणूक द्यावी, असे आवाहन ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ना. बावनकुळे यांच्या हस्ते नजीकच्या पोहणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. हे प्राथमिक आरोग्य केंद्र सौरऊर्जेवर करण्याची घोषणा ना. बावनकुळे यांनी केली. यावेळी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, आ. समीर कुणावार, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, सभापती जयश्री गफाट, मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले आदींची उपस्थिती होती.