बाबासाहेबांची ‘ती’ सेवाग्राम भेट अविस्मरणीय ठरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:54 PM2019-04-13T23:54:46+5:302019-04-13T23:59:09+5:30
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही शिकवण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजबांधवांना दिली. याच महामानवाची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भेट १ मे १९३६ ला सेवाग्राम येथील जुन्या वस्तीत झाली होती.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही शिकवण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजबांधवांना दिली. याच महामानवाची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भेट १ मे १९३६ ला सेवाग्राम येथील जुन्या वस्तीत झाली होती. हा योग अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडविणाराच होता, अशी माहिती त्या घटनेचे साक्षदार नामदेव गोसावी यांनी दिली.
सेवाग्राम येथे १ मे १९३६ मध्ये महात्मा गांधीजीना भेटण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यावेळी सदर दोन्ही महापुरूषांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली होती. आश्रमची सायंकाळची प्रार्थना झाल्यानंतर ते जुन्या वस्तीत समाजबांधवांना भेटावयास आले. मोकळ्या मैदानात एका दगडावर बसून त्यांनी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्त्वावर समाजाची उभारणी करण्याचे ध्येय व उद्दिष्ट समोर ठेवले होते. यात शिक्षण व चारित्र्य यावर त्यांचा विशेष भर होता. समाजबांधवांना त्यांनी आपल्या मुला-बाळांना शिक्षण द्या, संस्कार देऊन चारित्र्यवान बनवा, राहणीमान सुधारा आणि व्यसन करू नका, असा मोलाचा सल्ला दिला होता, असे नामदेव गोसावी यांनी सांगितले. त्यावेळी मी लहान होतो.
डॉ. आंबेडकरांचे शेवटचे भाषण मी नागपूरच्या दीक्षाभूमीवर ऐकले. त्यांची अनेक वाक्ये मला अजूनही आठवतात. मी घरावर तुळशीपत्र ठेवले; पण तुम्ही कुटुंब सांभाळा आणि घडवा, असे आवाहन त्यांनी केले होते.
सेवाग्राम येथील जुन्या वस्तीतील अ.भा.बौद्ध महासभा समितीअंतर्गत परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ आजही आहे. डॉ. आंबेडकर ज्या दगडावर बसले होते, त्या परिसराला सुशोभित करण्यात आले आहे. शिवाय, सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत याच परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे गांधीजींशी भेटण्यासाठी सेवाग्राम येथे आले होते. त्यांच्यात विविध विषयावर त्यावेळी चर्चा झाली. सायंकाळी गावातील नागरिकांशी ते भेटले. आश्रमाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
- टी. आर. एन. प्रभू, अध्यक्ष, गांधी आश्रम, सेवाग्राम.