शैक्षणिक संस्थांच्या परिसरात थुंकणे पडणार महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 11:03 AM2021-08-07T11:03:13+5:302021-08-07T11:06:58+5:30

Wardha News विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शैक्षणिक संस्थांच्या परिसरात थुंकण्यावर प्रतिबंध घातला आहे. वारंवार थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत.

It will be expensive to spit in the premises of educational institutions | शैक्षणिक संस्थांच्या परिसरात थुंकणे पडणार महागात

शैक्षणिक संस्थांच्या परिसरात थुंकणे पडणार महागात

Next
ठळक मुद्देशालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आदेशभरावा लागणार दोनशे रुपये दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा: कोविडचा विषाणू हवेच्या माध्यमातून पसरणारा आहे. या विषाणूने बाधित झालेल्या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे इतर व्यक्तिही प्रभावित होऊन प्रसार वाढू शकतो. तसेच थुंकल्यामुळे क्षयरोगासारखे अन्य आजारही बळावण्याचा धोका असतो. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शैक्षणिक संस्थांच्या परिसरात थुंकण्यावर प्रतिबंध घातला आहे. वारंवार थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत.

कोरोनाच्या काळात दुसरी लाट भयावह ठरली असून आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: तिसरी लाट बालकांसाठी घातक असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे, त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि शाळा परिसर निरोगी ठेवणे, ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शाळा परिसरात थुंकल्यामुळे निर्माण होणारे आरोग्य विषयक संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नयेत, कोरोनासह इतर आजारांची लागण होऊ नये याकरिता शासनाने सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ‘थुंकणे विरोधी’ मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सर्व शैक्षणिक संस्था या सार्वजनिक ठिकाण असल्यामुळे परिसरात थुंकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आदर्श असतात, त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. शिक्षकांकडून या सूचनांचे उल्लंघन झाल्यास प्रतिव्यक्ती २०० रुपये दंड वसूल करण्यात येईल. असे वारंवार घडल्यास कमाल १ हजार २०० रुपये दंड देय राहील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे ही पालकांसोबत सामान्य नागरिकांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनीही या सूचनांचे उल्लंघन केल्यास त्यांनाही शिक्षकांप्रमाणेच दंड देय राहणार आहे. याप्रकरणी दंड वसूल करण्याचा अधिकार हा संबंधित शैक्षणिक संस्थेतील मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांना राहणार आहे. या सर्व मार्गदर्शक सूचनांवर नियमित देखरेखीची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्था प्रमुख किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या शिक्षकांवर असेल, असेही आदेशात नमूद केले आहे. पण, याची खरेच अंमलबजावणी होईल का?, हे लवकरच कळणार आहे.

प्रार्थनेनंतर पटवून द्यावे लागणार महत्त्व

शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची मूल्ये रुजण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी सामाईक प्रार्थनेनंतर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या सार्वजनिक स्वच्छता व वैयक्तिक स्वच्छता या विषयाचे महत्त्व पटवून द्यावे. लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु आहे. या ऑनलाईन प्लॅटफार्मवर वर्ग सुरु होण्यापूर्वी थुंकल्याने होणाऱ्या आजाराविषयी माहिती द्यावी तसेच स्वच्छतेची मूल्ये अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही शासनाकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: It will be expensive to spit in the premises of educational institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा