आॅटोतून विद्यार्थ्यांची वाहतूक करणे महागात पडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 09:47 PM2019-06-29T21:47:34+5:302019-06-29T21:47:57+5:30
प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, वर्धा जिल्ह्यातील विविध भागात या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने १ जुलैपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, वर्धा जिल्ह्यातील विविध भागात या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने १ जुलैपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सदर विभागाने दोन चमू सज्ज केल्या असून या चमूतील अधिकारी नियमांना बगल देणाऱ्या आॅटाचालकांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करणार आहेत.
प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या एका आॅटो रिक्षातून १२ वर्षावरील तीन जणांची वाहतूक करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय तसा नियम आहे. परंतु, सध्या सदर नियमाला डावलूनच आॅटो रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत असल्याचे पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, कुठल्याही प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून विद्यार्थ्यांची ने-आण करू नये, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, काही आॅटोचालक मनमर्जीनेच विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. हा प्रकार न्यायालयाच्या सूचनांना पाठ दाखविणारा असल्याने तसेच एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा असल्याने मनमर्जीने काम करणाºया आॅटोचालकांना वठणीवर आणण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग १ जुलैपासून जिल्ह्यात विशेष मोहीम राबविणार आहे. त्यासाठी दोन चमू तयार करण्यात आल्या आहेत. या चमूतील अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील विविध भागात प्रत्यक्ष जाऊन नियमांना पाठ दाखविणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.
१७४ स्कूल बससेचा परवाना केला निलंबित
उपप्रादेशिक परिवहन विभागाने तब्बल १७४ स्कूल बसेसचा परवानाच निलंबित केला आहे. या बसेसमधून जर विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आढळल्यास ते वाहनच जप्त करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात एकूण ४७४ छोट्या-मोठ्या स्कूल बसेस आहेत.
प्रवासी वाहतुकीसाठी ३ हजार १६८ आॅटोरिक्षांची नोंदणी
वर्धा जिल्ह्यात एकूण ५ हजार आॅटो रिक्षा असल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी ३ हजार १६८ आॅटो रिक्षांना प्रवासी वाहतुकीचा परवाना देण्यात आला आहे. परंतु, एखाद्या आॅटो रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे या मोहिमेदरम्यान निदर्शनास आल्यास त्या आॅटोचा परवानाच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून निलंबित करण्यात येणार आहे.
मुख्याध्यापकांच्या अडचणीत पडणार भर
ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक नियमबाह्यपणे आॅटो रिक्षातून होत आहे, अशा शाळेच्या मुख्याध्यापकावरही कारवाई करण्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या विचाराधीन आहे. त्याला वरिष्ठ अधिकाºयांकडून हिरवी झेंडी मिळाल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून १ जुलैपासून विशेष मोहीम आम्ही राबविणार आहो. त्यासाठी दोन चमू सज्ज करण्यात आल्या आहेत. शिवाय परवाना निलंबित करण्यात आलेल्या १७४ स्कूल बसमधून जर विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे, असे आढळल्यास ती स्कूल बसच जप्त करण्यात येणार आहे.
- विजय तिराणकर, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.