तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:11 PM2019-01-14T22:11:17+5:302019-01-14T22:11:40+5:30
तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला मकर संक्रांतीनिमित्त या विधानाची पुनरावृत्ती वर्षा-नुवर्षापासून सातत्याने होत आली आणि येत राहिली. ती केवळ औपचारिकता राहू नये, तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे आहे, मत मानसशास्त्रज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर यांनी व्यक्त केले. आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द इतरांना न दुखावणारे असावेत.
तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला मकर संक्रांतीनिमित्त या विधानाची पुनरावृत्ती वर्षा-नुवर्षापासून सातत्याने होत आली आणि येत राहिली. ती केवळ औपचारिकता राहू नये, तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे आहे, मत मानसशास्त्रज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर यांनी व्यक्त केले. आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द इतरांना न दुखावणारे असावेत. म्हणजे खऱ्या अर्थाने स्नेह, आपुलकीचे, प्रेमाचे नाते जोडले जाऊ शकते, हे सहज शक्य आणि बिनखर्चाचे आहे. दुसऱ्यांशी रागाने बोलणारी माणसे अनेक आहेत. राग अनावर झाला असताना व्यक्ती आपली भावना व्यक्त करीत असते, तेव्हा ती बाह्य लक्षणांवरून सुंदर न दिसता विकृत दिसते. राग ही नकारार्थी भावना असून त्याचे शरीरावर नकारार्थीच परिणाम होतात. म्हणून स्वत:च्या भावनांचे संयमन साधत नकारार्थी भावनांना दूर ठेवून सकारात्मक जीवन जगणे शक्य आणि सोपे आहे. त्याकरिता अभिवृत्तीमध्ये बदल करणे महत्त्वाचे ठरते. मन ही अमूर्त संकल्पना असल्याने व मनाला स्वत:चे शरीर नसल्याने रागामुळे जो ताणतणाव निर्माण होतो, त्याचे पडसाद शरीरावर उमटत असतात आणि त्यातूनच विविध प्रकारचे मनोशारीरिक आजार उद्भवतात असेही डॉ. निंबाळकर म्हणाले.
आपल्याच मुखातून बाहेर पडणारे शब्द हे केवळ शब्द असले तरी ते इतरांसाठी असतात. शब्द माणसांना जोडतात अन् कायमचे दूरही सारतात. म्हणून शब्द तोलून, मापून बोलणे बरेचदा गरजेचे असते. बऱ्याच गोष्टी मनाला पटत नसल्या तरी वागण्या-बोलण्याशी सुसमायोजन साधून गोड बोलण्यात गैर काय? जग, समाज सुंदर आहे. आपण स्वास्थ्य जपले पाहिजे.