गांधी सांगण्याची नव्हे जगण्याची गोष्ट आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 10:37 PM2017-09-02T22:37:39+5:302017-09-02T22:38:00+5:30
गांधीजींची कर्मभूमी व प्रयोगभूमी सेवाग्राम असून १० वर्षांच्या वास्तव्यात अनेक कार्यक्रम येथून राबविले गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : गांधीजींची कर्मभूमी व प्रयोगभूमी सेवाग्राम असून १० वर्षांच्या वास्तव्यात अनेक कार्यक्रम येथून राबविले गेले. दिल्लीनंतर या भूमीला महत्त्व प्राप्त झाले होते. गांधी सांगण्याची नव्हे तर जगण्याची गोष्ट आहे. तेव्हाच खºया अर्थाने बापू कळेल, असे मत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी व्यक्त केले.
जगाच्या इतिहासात आंदोलने व क्रांती मोठ्या शहरात झाल्या; पण गांधीजींनी सत्याग्रह व असहकाराची चळवळ खेड्यापाड्यातून सुरू केली. महात्मा गांधीजींबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी त्यांच्या जीवन पद्धतीचा व तत्त्वांचा गंभीरतेने विचार व अंगीकार करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
यात्री निवासच्या आचार्य दादा धर्माधिकारी सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने गांधी १५० च्या निमित्ताने राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. अतिथी म्हणून महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, डॉ. रवींद्र रूख्मिनी, डॉ. उल्हास जाजू, सुनील स्वामी, माधव बावगे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, विवेकवादी गांधी समजावून घेण्यासाठी गांधींचे अनुयायी होण्यापेक्षा त्यांचे सहकारी बनण्याची गरज आहे. इतिहासातील ओझे वर्तमानात घेऊन न जगता त्या परिस्थितीत गांधी कसे जगले, हे समजावून घेणे गरजेचे आहे. डॉ. रूख्मिनी यांनी कार्यकर्ता कसा घडावा यापेक्षा गांधी कार्यकर्त्यांप्रमाणे जगले. यातून कार्यकर्ते घडले, असे सांगितले. डॉ. जाजू यांनी संघटनात्मक शक्तीतून सामाजिक स्तरावरील कार्य व्हावे. कर्माला पूजा माणून कृतिशील कार्य व्हावे. दुसºयांच्या सेवेतून मानवाची प्रगती होते, असे सांगितले. प्रा. शेखर सोनारकर यांनी खरा विवेकी गांधी समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. प्रारंभी प्रकाश कांबळे यांनी प्रबोधन गीत सादर केले. प्रास्ताविक गजेंद्र सुरकार, संचालन अजय सावरकर व सारिका डेहनकर यांनी केले तर आभार सुनील स्वामी यांनी मानले.