बौद्धधम्म परिषदेत वेगळ्या विदर्भाचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:40 AM2019-01-14T00:40:52+5:302019-01-14T00:42:42+5:30
वैदर्भीय तसेच या नागभूमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती. आज याच भूमीतील शेतकरी व शेतमजूर राज्यकर्त्यांच्या लुटीच्या व्यवस्थेत भरडल्या जात आहे. विदर्भातील जवळपास ३३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून याला राजकीय धोरणच जबाबदार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वैदर्भीय तसेच या नागभूमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती. आज याच भूमीतील शेतकरी व शेतमजूर राज्यकर्त्यांच्या लुटीच्या व्यवस्थेत भरडल्या जात आहे. विदर्भातील जवळपास ३३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून याला राजकीय धोरणच जबाबदार आहे. त्यांनी बिनखर्चाची शेती खर्चाची करुन या शेतकरी समाजाला वाळवी लावली आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी आणि या विदर्भाच्या भूमीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी विदर्भ वेगळा करण्याशिवाय पर्याय नाही, आणि त्यासाठी सर्व समाजबांधवांची एकजुट आवश्यक आहे, असे मत बौद्धधम्म परिषदेचे उद्घाटक विदर्भवादी अनिल जवादे यांनी मांडले. त्यांच्या या मुद्यांचे सर्वांनी स्वागत करुन ‘जय भीम, जय विदर्भ’ च्या दिल्या घोषणा देत ठरावही घेतला.
स्थानिक सेवाग्राम रोडलगतच्या महिलाश्रम शाळेच्या मैदानावर ३२ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष म्हणून भदन्त शांतरक्षीत महाथेरो, मुख्य मार्गदर्शक राजरत्न आंबेडकर, स्वागताध्यक्ष डि.के.पाटील, सुनिल ढाले यांच्यासह, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, डॉ. राजा टाकसाळे, विशाल मानकर, डॉ.राजकुमार शेंडे, उमेश म्हैसकर, भदन्त सुमेधबोधी महाथेरो, भदन्त सत्यानंद महाथेरो, भदन्त प्रज्ञाशील महाथेरो, भदन्त धम्मज्योती महाथेरो, भदन्त धम्मसेन महाथेरो, भदन्त विपश्यी महाथेरो, भदन्त श्रीपाद थेरो, भदन्त महामोग्गलयान व भदन्त अभयनायक यांच्यासह भिक्खू संघ यांची उपस्थिती होती. सकाळी भदन्त महाथेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण, बुद्धवंदना व धम्मदेसनाने परिषदेला सुरुवात झाली. त्यानंतर भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी हिंगणघाटच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत, अभिवादन गीत व नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या परिषदेदरम्यान सुहास थुल, निरज ताकसांडे, प्रजापाल शेंदरे, विकास भालांदरे व धनंजय नाखले यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी परिषदेचे अध्यक्ष भदत्न महाथेरो यांनी त्रीशरण, पंचशील तसेच बुद्ध, धम्म व संघ वंदना सर्वांच्या सोबत म्हणून संस्कृतीची जोपासण्याचा सल्ला दिला.
तर दुपारच्या सत्रात ‘बौद्ध धम्माची वास्तविकता आदर्श आणि आपण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. सुषमा अंधारे व संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केले. परिषदेचे संचालन व प्रास्ताविक भदन्त राजरत्न यांनी केले. या परिषदेला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.