बहीण-भाऊ सांगून आर्वीत किरायाने केलेल्या खोलीत शिजला 'जगदीश'च्या हत्येचा कट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 06:02 PM2022-02-07T18:02:09+5:302022-02-07T18:56:57+5:30
मृत जगदीशची पत्नी दीपाली आणि तिचा प्रियकर शुभम या दोघांनी आपण बहीण-भाऊ असल्याचे सांगून आर्वी येथे किरायाने खोली केली होती. याच खोलीत आरोपींनी जगदीशच्या हत्येचा नियोजनबद्ध कट रचल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
आष्टी (शहीद) : संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असलेल्या येथील जगदीश देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मृत जगदीशची पत्नी दीपाली आणि दीपालीचा प्रियकर शुभम या दोघांनी आपण बहीण-भाऊ असल्याचे सांगून आर्वी येथे किरायाने खोली केली होती. याच खोलीत दीपाली, शुभम व विजय यांनी जगदीशच्या हत्येचा नियोजनबद्ध कट रचल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
विशेष म्हणजे दीपाली, शुभम व विजय यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेअंती २० हजार रुपये मिळणार असल्याने दीपाली व शुभम यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या जगदीशला जिवानिशी ठार करण्याच्या कामासाठी विजय याने होकार दिल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे.
जगदीश देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी शुभम जाधव, दीपाली देशमुख तसेच विजय माने या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिन्ही आरोपींनी नियोजनबद्ध कट रचून दीपाली आणि शुभम यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या दीपालीचा पती जगदीश याची हत्या केली; पण त्यांनी नियोजन केल्याप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लागण्यापूर्वीच बिंग फुटले.
सासू मुलीकडे गेल्याची साधली संधी
जगदीशची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी जगदीशची आई मथुरा भानुदास देशमुख या मुलीकडे गेल्या होत्या. नेमकी हीच संधी साधून दीपाली, तिचा प्रियकर शुभम, त्याचा साथीदार विजय या तिघांनी मिळून जगदीशला जिवानिशी ठार केले. विशेष म्हणजे हत्येपूर्वी रात्री या सर्वांनी सामूहिक भोजन घेतले. यावेळी जगदीशला मनसोक्त दारू पाजण्यात आली. मद्यधुंद अवस्थेतील जगदीश याला शुभमने विविध विषयांच्या गोष्टीत व्यस्त ठेवले. जेवणानंतर झाेपी गेलेल्या जगदीशवर लाकडी पाटीने किमान नऊ वेळा प्रहार केला. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जगदीशच्या गुप्तांगावर वार करून त्याचा गळा आवळला. यातच जगदीश याचा मृत्यू झाला.
शुभमने वाढविली हिम्मत
दीपालीचा प्रियकर शुभम याने त्याचा भाचा विजय माने याला या प्रकरणासाठी मदत मागत त्याला पैशाचे आमिष दिले. अवघ्या काही वेळेच्या कामासाठी तब्बल २० हजार मिळत असल्याने तोही तयार झाला. विजयच्या भरवशावर आपली मोहीम फत्ते होणार अशी हिम्मत शुभम हा दीपाली हिला देत होता; पण मृतदेहाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यापूर्वीच तिन्ही आरोपी पोलिसांच्या गळाला लागले.
पोलिसी वाहनाचा हॉर्न वाजताच काढला पळ
जगदीशच्या हत्येनंतर आरोपींनी जगदीशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या कामाला प्राधान्यक्रम दिला; पण घटनेच्या दिवशी आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे हे एका चोरीच्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी नवीन आष्टी परिसरात गेले होते. याच पोलिसी वाहनाच्या हॉर्नचा आवाज कानावर पडताच जगदीशचा मृतदेह पोत्यात भरून धरण परिसरात फेकण्यासाठी जात असलेल्या आरोपींनी मृतदेह शिक्षकाच्या घरासमोर फेकून यशस्वी पळ काढला; पण बिंग फुटल्यावर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत अटक केली.