‘जय श्रीराम’च्या गजराने निनादले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:28 PM2018-03-25T22:28:57+5:302018-03-25T22:28:57+5:30

श्री राम जन्मोत्सवानिमित्त शहरात प्रभू श्रीरामाचे वंदन करण्यात आले. श्रीराम मंदिर देवस्थान व श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती सजविलेल्या रथावर शोभून दिसत होती.

'Jai Shriram' carries the city of Nainadale | ‘जय श्रीराम’च्या गजराने निनादले शहर

‘जय श्रीराम’च्या गजराने निनादले शहर

Next
ठळक मुद्देराम जन्मोत्सव शोभायात्रा : सजीव देखाव्यांनी घातली भाविकांना भूरळ

आॅनलाईन लोकमत
वर्धा : श्री राम जन्मोत्सवानिमित्त शहरात प्रभू श्रीरामाचे वंदन करण्यात आले. श्रीराम मंदिर देवस्थान व श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती सजविलेल्या रथावर शोभून दिसत होती. शिवाय श्रीराम जन्मोत्सवाचे तथा रामायण काळातील विविध प्रसंगांचे सजीव देखावे शोभायात्रेत सहभागी करण्यात आले होते. या सजीव देखाव्यांनी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाकरिता शहराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. बजाज चौक ते शिवाजी पुतळ्यापर्यंत तोरणे, फलक, स्वागत कमानी, भगव्या पताकांची सजावट करण्यात आली होती. बजाज चौक परिसरात व्यासपीठावर प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करून भजनांचे कार्यक्रम पार पडले. शहरातील सोशालिस्ट चौकातही सकाळी प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. श्रीराम मंदिर तथा बाजारपेठ परिसरातही भगव्या पताका, स्वागत कमानींनी वातावरण राममय झाल्याचे दिसून आले.
गोलबाजार महादेवपूरा येथील श्रीराम मंदिरात सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्रीराम जन्माचे कीर्तन पार पडले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी ५ वाजता श्रीराम मंदिरातून प्रभू श्रीरामाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. राम मंदिरातून निघालेली ही शोभायात्रा बाजारपेठ परिसरातून फिरून मुख्य मार्गावर आली तेव्हा भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. शोभयात्रेत प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण तथा हनुमंताच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी झाले होते. प्रभू श्रीरामाच्या जीवनातील विविध प्रसंगांवर सजीव देखावे साकारण्यात आले होते. शिवाय विठ्ठल-रूख्माई, हनुमंत, महादेव, परशुराम यांच्यासह संतांच्या मूर्ती शोभायात्रेत सहभागी करण्यात आल्या होत्या. सहभागी चिमुकल्यांचे लेझीम पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेप्रसंगी श्रीराम मंदिर ते मुख्य मार्गावरही भाविकांचा जनसागरच लोटला होता. शोभायात्रेत सहभागी भजनी दिंड्या, बँड पथक, ढोल-ताशे, डीजे तथा रामनामावर थिरकणारी तरूणाई वर्धेकरांचे आकर्षण ठरली. नेत्रदिपक रोषणाई व भगव्या पताका, ध्वजांनी वातावरण भक्तीमय झाले होते. शोभायात्रेत सहभागी दीपमाळ लक्षवेधक ठरली. प्रभू श्रीरामाच्या नाम गजराने वर्धा शहर निनादले.
तत्पूर्वी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा मिरवणुकी काढण्यात आल्या. सकाळी बाईक रॅली काढण्यात आली. यानंतर गिरीश अग्निहोत्री यांची रामनगर भागातून शोभायात्रा निघाली. यात प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण तथा हनुमंतांच्या वेशभूषेत महिलांनी सजीव देखावा साकारला होता. शेकडो महिलाही पांरपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. प्रभू श्रीरामाची मूर्ती, प्रतिमा आणि हातात भगवे झेंडे घेतलेले भाविक सर्वांचे लक्ष वेधत होते. शोभायात्रेत अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. एका सुशोभित ट्रकवर ठेवलेली ही प्रतिकृती राम मंदिराचे दर्शन घडविणारीच ठरली. रामनगरातून निघालेली ही शोभायात्रा मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत गोलबाजारातील श्रीराम मंदिरात पोहोचली. येथे विधीवत पूर्जाअर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातही सर्वत्र श्रीराम जन्मोत्सव उत्साहात तथा भक्तीभावाने साजरा करण्यात आला. प्रभू श्री रामाची शोभायात्रा काढण्यात आली. यातील सजीव देखावे भक्तीमय वातावरणाची निर्मिती करणारे ठरले. पवनार, आंजी (मोठी), पुलगाव, देवळी, आर्वी येथेही रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. श्री हनुमान देवस्थान, सुकळी (बाई), येथे दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव, प्रसाद वितरण पार पडले. श्री काळा मारुती महादेव धाम मंदिर ट्रस्ट सुकळी (बाई) येथै सकाळी ६ वाजता दीप कलश पूजा व विणा आरंभ तथा राम जन्माचा कार्यक्रम पार पडला. साई मंदिर रुग्णालय परिसर सावंगी (मेघे) येथे सकाळी १०.३० वाजता रामजन्माचे कीर्तन झाले. श्रीराम मंदिर देवस्थान पवनार येथे सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मधुमेह तपासणी शिबिर, सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत श्रीराम जन्मोत्सव कीर्तन, श्रीराम प्रभुची रथयात्रा श्रीराम मंदिर देवस्थान पवनारच्यावतीने काढण्यात आली. सिंदी (मेघे) येथे रामधाम चौकात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राममंदिर निर्माण संकल्प यज्ञ व महाप्रसाद पार पडला. कृृष्णधाम कृष्ण मंदिर कारला रोड येथे सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत प्रा. श्याम देशपांडे यांचे संगीत श्रीराम कथा ज्ञानयज्ञ पार पडला.
पोलिसांचा बंदोबस्त
श्रीराम जन्मोत्सव मिरवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, मिरवणुकी शांततेत पार पडाव्या म्हणून पोलिसांकडून दक्षता पाळण्यात आली आहे. वर्धा शहरातील शहर, रामनगर, सावंगी व सेवाग्राम पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शिवाय जिल्ह्यातही पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला.

Web Title: 'Jai Shriram' carries the city of Nainadale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.