संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:42 PM2018-11-18T23:42:46+5:302018-11-18T23:43:44+5:30
बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र झालेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध करून जेलभरो आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र झालेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध करून जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी आवाज बुलंद करण्यात आला. याप्रसंगी ३१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस कचेरीत नेले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सकाळी १० वाजतापासून बहूजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यास सुरूवात केली. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला सादर केले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या ३१ जणांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे नेले. तेथून त्यांची काही वेळेनंतर सुटका करण्यात आली. आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, मुलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय किसान मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, संभाजी ब्रिगेड, भीम आर्मी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, टीपू सुल्तान ग्रुप यांच्यासह विविध संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.