वर्धा रेल्वे स्थानकावर ‘जनता खाना’चा काळाबाजार
By Admin | Published: July 7, 2015 01:34 AM2015-07-07T01:34:51+5:302015-07-07T01:34:51+5:30
मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांना जेवणाकरिता भटकंतीची वेळ येवू नये, याकरिता ‘जनता खाना’ योजना अंमलात आणली.
१५ रुपयांचे पार्सल २० रुपयात, दर्जाही निकृष्ट : नियमांना बगल, रेल्वे स्थानक प्रबंधकासह प्रशासनाचेही दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा
मध्य रेल्वेच्या प्रवाश्यांना जेवणाकरिता भटकंतीची वेळ येवू नये, याकरिता ‘जनता खाना’ योजना अंमलात आणली. वर्धेत मात्र या योजनेत काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. १५ रुपये किंमत असलेले एका व्यक्तीच्या जेवणाचे पार्सल २० रुपयांत विकल्या जात आहे. शिवाय त्याचा दर्जाही निकृष्ट असल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये पुढे आले. याची माहिती रेल्वे प्रशासनाला देताच त्यांचीही भंबेरी उडाली. या जेवणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
जनता खान्याची रेल्वे प्रशासनाकडून तपासणी नाही
कमी किमतीत चांगले जेवण रेल्वे प्रवाश्यांना देता यावे म्हणून रेल्वे प्रशासनाने ‘जनता खाना’ ही योजना सुरू केली; पण त्या जेवणाचा दर्जा कुणीही तपासत नाही. यामुळे कंत्राटदार कंपन्याही निकृष्ट जेवण देऊन पैसा कमविण्याचा गोरखधंदा करीत असल्याचे येथे उघड झाले. या निकृष्ठ जनता खान्यामुळे प्रवाश्यांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.
कंत्राटदाराकडून प्रवाशांची लूट
देशातील संपूर्ण रेल्वे स्थानकांवर १५ रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. जनता खाना ही योजना त्यासाठीच सुरू करण्यात आली आहे; पण यातही प्रवाश्यांची लूट होत असल्याचे दिसते. १५ रुपयांऐवजी २० रुपये घेऊन प्रवाश्यांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याचे समोर आले.