‘दी बर्निंग’ ट्रकचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:47 PM2018-05-24T23:47:04+5:302018-05-24T23:47:04+5:30
बोथली येथून कोंढाळी येथील शासकीय गोदामात तेंदू पत्ता घेऊन जाणाऱ्या ट्रकने टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ पेट घेतला. यात तेंदू पत्त्यासह ट्रक खाक झाला. ही घटना गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू/झडशी : बोथली येथून कोंढाळी येथील शासकीय गोदामात तेंदू पत्ता घेऊन जाणाऱ्या ट्रकने टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ पेट घेतला. यात तेंदू पत्त्यासह ट्रक खाक झाला. ही घटना गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. लोंबकळणाºया वीज तारांचा स्पर्श झाल्याने तेंदू पत्त्याने पेट घेतल्याचे सांगण्यात आले.
बोथली येथे तेंदू पत्ता गोळा करून वाविण्यास ठेवला होता. तो तेंदु पत्ता एमएच ३१ एपी ६८४५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरून कोंढाळी येथील शासकीय गोदामात नेला जात होता. ट्रक बोथलीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या टाकळी येथील लक्ष्मी माता मंदिरापर्यंत पोहोचला असता ऐन गावालगत रस्त्यावर लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा तेंदु पत्त्याला स्पर्श झाला. यामुळे प्रथम तेंदू पत्त्याने पेट घेतला व आगीने क्षणार्धात ट्रकला आपल्या कवेत घेतले. ही बाब वाहन चालक मालक अरविंद विट्ठल सोनेकर (५४) रा. जुनोना (फुके) ता. नरखेड यांच्या लक्षात येताच त्यांनी खाली उतरून आग विझविण्यासाठी धडपड केली. यात त्यांना आस लागली.
गावातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत सावरकर यांच्या शेतातून पाईप टाकून कृषी पंपाद्वारे ट्रकला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, वर्धा न.प. च्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले; पण ग्रामस्थांनी आग विझविल्यानंतर अग्निशमन दल टाकळी गावात दाखल झाले.
माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वीज तारांमुळे आग लागल्याने विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली; पण वीज कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले नाही.
दहा वर्षांतील दुसरी घटना
रस्त्यावर लोंबकळणाऱ्या विद्युत तारांना स्पर्श होऊन आग लागण्याची दहा वर्षांतील दुसरी घटना असून वीज कंपनी दुरूस्ती करीत नाही. ही घटना गांभीर्याने घेत दुरूस्ती गरजेची झाली आहे.