जवानाचे आकस्मिक निधन, कर्तव्यावर असताना आली भोवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 17:46 IST2019-02-15T17:45:45+5:302019-02-15T17:46:03+5:30
सीआरपीएफ नागपूर येथे कार्यरत असलेल्या पवनार येथील जवानाचा आकस्मिक मृत्यू झाला.

जवानाचे आकस्मिक निधन, कर्तव्यावर असताना आली भोवळ
पवनार (वर्धा)- सीआरपीएफ नागपूर येथे कार्यरत असलेल्या पवनार येथील जवानाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजता सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात घडली. यामुळे पवनार गावात शोककळा पसरली आहे. सचिन सुरेश मेहर (२६) रा. पवानार असे जवानाचे आहे.
तो सीआरपीएफ नागपूर येथे कार्यरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पाढरकवडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असल्यामुळे बंदोबस्ताकरिता सचिनला पाचारण करण्यात आले होते. तेथे कर्तव्यावर असताना अचानक भोवळ येऊन खाली पडला. सहकाऱ्यांनी तत्काळ त्याला सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात हलविले. परंतु शुक्रवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. सचिनच्या अचानक निघून जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. गावातही हळहळ व्यक्त होत आहे. दुपारी पवनार येथील मोक्षधामात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या वतीने त्याला मानवंदना देण्यात आली.