ज्वारीविना हुरडा पार्टी इतिहासजमा
By admin | Published: December 27, 2014 10:55 PM2014-12-27T22:55:46+5:302014-12-27T22:55:46+5:30
हिवाळा सुरू झाला की पूर्वी ग्रामीण भागातील सर्वांना हुरडा पार्टीची चाहुल लागायची. गुलाबी आणि कुडकडणाऱ्या थंडीत शेतात शेकोटी पेटवून मोठ्या हिरव्या ज्वारीच्या कणसाचा हुरडा भाजून खाण्यात
वर्धा : हिवाळा सुरू झाला की पूर्वी ग्रामीण भागातील सर्वांना हुरडा पार्टीची चाहुल लागायची. गुलाबी आणि कुडकडणाऱ्या थंडीत शेतात शेकोटी पेटवून मोठ्या हिरव्या ज्वारीच्या कणसाचा हुरडा भाजून खाण्यात वेगळीच मौज असायची. परंतु आता जिल्ह्यात ज्वारीचे उत्पन्नच नाममात्र झाल्याने हिवाळ्यातील हुरडा पार्टी इतिहासजमा झाल्याचे चित्र आहे.
काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. ज्वारीची कणसं डौलानं शेतात डोलायची. पोळा ते दसरा या दरम्यान ज्वारीची पेरणी व्हायची. चविष्ट व कुरकुरीत भाकरी देणारी पौष्टिक ज्वारी म्हणून तिची ओळख होती. परंतु भाकरीपेक्षाही हिरवी ज्वारी हुरड्यासाठी अत्यंत प्रसिद्ध होती. ऐन हिवाळ्याच्या दिवसात या ज्वारीचा हुरडा व्हायचा. ग्रामीण भागात हुरडा म्हटले की सगळयांच्याच तोंडाला पाणी सुटायचे.
शेतकऱ्याचा ‘रानमेवा’ म्हणून हुरड्याची ओळख होती. एक चवदार, गोड, पौष्टिक आणि शरीरवर्धक पदार्थ म्हणून याकडे बघितले जायचे. शेतातील ज्वारीचा हुरडा झाला की, सकाळ, सायंकाळी शेत माणसांनी फुलून जात असत. चार-दोन माणसे जमली की शेतात शेकोटी पेटवायची, १०-२० टपोरे कणसं काढायचे आणि लालबुंद विस्तवावर भाजायची. निखाऱ्यात भाजलेली कणसे तरटावर किंवा हातावर चोळायची आणि मस्त ताव मारायचा. सोबत तोंडी लावायला प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या भाजलेल्या, लाल लसणी चटणी, दही, गुळ आदींची चव असायची. अशा लज्जतदार हुरडा मेजवानीची मजा काही वेगळीच असल्याने शेजारी, मित्र मंडळी, सोयरे हायरे मोठ्या संख्येने हुरडा खाण्यासाठी यायचे.
परंतु सध्यस्थितीत जिल्ह्यात हिरवी ज्वारी नजरेसही सापडत नाही. ग्रामीण भागात काहीच शेतकरी घरी चवीला ज्वारी व्हावी आणि जनावरांसाठी कडबा मिळावा म्हणून ज्वारी पेरतात. विज्ञानाच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात शेती करण्यात स्पर्धा सुरू झाली आहे. लोकसंख्या वाढीचा विचार करता जास्त उत्पन्न तेही कमी काळात देणारे संकरीत वाण विकसित झाली आहे. त्यातही जिल्ह्यात ज्वारीचे पीक घेणेचे जवळजवळ बंद झाले आहे. फारच थोडे शेतकरी घरच्यापुरती ज्वारी पेरतात.(शहर प्रतिनिधी)