सराफाच्या पायावर चाकूने वार; रोखेसह १३ लाखांचे दागिने चोरले

By रवींद्र चांदेकर | Published: July 6, 2024 05:09 PM2024-07-06T17:09:40+5:302024-07-06T17:18:07+5:30

वणा नदीच्या पुलावर रात्री थरार : अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Jewelery worth 13 lakhs stolen along with cash | सराफाच्या पायावर चाकूने वार; रोखेसह १३ लाखांचे दागिने चोरले

Jewelery worth 13 lakhs stolen along with cash

वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील सराफा दुकान बंद करून हिंगणघाटला परत जात असलेल्या सराफा व्यावसायिकास दोघांनी रस्त्यात अडवून चाकूने पायावर वार करीत त्याच्याकडील दागिन्यांसह रोख असलेली हॅण्डबॅग हिसकावून तिघांनी दुचाकीने धूम ठोकली. ही घटना ५ जुलै रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास वणा नदीच्या पुलावर घडली. लागोपाठ घडत असलेल्या अशा घटनांनी हिंगणघाट शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्ती डोकेवर काढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध शनिवारी ६ जुलै रोजी पहाटे ५ वाजता गुन्हा दाखल केला.

सुभाष विनायक नागरे (४३ रा. संत ज्ञानेश्वर वॉर्ड) असे जखमी सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. सुभाष हा ५ जुलै रोजी दररोज प्रमाणे सकाळी ११ वाजता एमएच. ३२ एएल. ५७८० क्रमांकाच्या मोटारसायकलने घरून सोन्याचे दागिने आणि ६० हजार रुपये रोख घेऊन वडनेर येथील त्यांच्या सराफा दुकानात जाण्यासाठी निघाले. दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास वडनेर येथे पोहोचून दुकान उघडले. दिवसभर दुकानात ५०० रुपयांचे ६०० मिली. ग्रॅम सोन्याची विक्री केली. तसेच दुकानात आलेल्या दुरुस्ती व गहाण ठेवलेले दागिने सोडवून ग्राहकांकडून ६० हजार रुपये दिले. तसेच उधारीचे २ हजार रुपये आणि चांदीच्या दागिने विक्रीचे दीड हजार रुपये व चिल्लर पैसे जमा झाले. सुभाषने दागिने गहाण ठेवलेल्या वस्तूंचे ५७ हजार रुपये वाटप केले. दुकान बंद करून हिशेब केला असता त्यांच्याकडे ७१ हजार रुपये आणि १२ लाख ७२ हजार ९६० रुपये किमतीचे २२१ ग्रॅम दागिने उरले होते. त्यांनी दागिने आणि ७१ हजारांची रोख व हिशेबाची डायरी असा एकूण १३ लाख ४३ हजार ९६० रुपयांचा ऐवज लॅपटॉप बॅगमध्ये भरून रात्री ८:१५ वाजताच्या सुमारास वडनेर येथून

हिंगणघाटसाठी रवाना झाले. ते वणा नदीवरील पुलावरून जात असतानाच अज्ञात दोघांनी त्यांना रस्त्यात अडवले. दोघेही तोंडाला रुमाल बांधून होते. त्यांनी झटापट करून सुभाषच्या डाव्या पायाच्या पोटरीवर सपासप वार करून जखमी करीत त्यांच्याकडील दागिने आणि रोख असलेली बॅग हिसकावून दुचाकीने पळ काढला. या घटनेची तक्रार त्यांनी हिंगणघाट पोलिसात दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९ (६),३(५) अन्वये गुन्हा दाखल केला.

२२१ ग्रॅम वजनाचे दागिने लंपास

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वाटमारी करणाऱ्यांनी सराफा व्यावसायिकास लुटले यात ३१.७५ ग्रॅम वजनाचे १२ टॉप्स जोड, १२ ग्रॅम वजनाचे सात नगर बेरी, ४ ग्रॅम वजनाचे बटण टॉप्सचे सहा जोड, २० ग्रॅम वजनाचे सात नग लॉकेट, ८.५ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या, १४ ग्रॅम वजनाच्या १५ नग सोन्याच्या रिंग, २० ग्रॅम वजनाचे १५ नग डोरले, १६.२५ ग्रॅम वजनाच्या तीन नग चेन, ५ ग्रॅम वजनाच्या ८ नग छोटे पेंडोल, सात ग्रॅम वजनाच्या तीन नग सोन्याचे लटकन, ५ ग्रॅम वजनाचे मोडीतील सोने, १० ग्रॅम वजनाचे कच्चे सोने, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, ४.५ ग्रॅम वजनाचे कारले मणी, २४ ग्रॅम वजनाच्या चार नग बादामी अंगठ्या, ७ ग्रॅम वजनाची सोन्याची एकदाणी, १० ग्रॅम वजनाच्या तीन पोत लॉकेट मणी, १२ ग्रॅम वजनाचे चार नग टॉप्स, असा एकूण १२ लाख ७२ हजार ९६० रुपये किमतीचे २२१ ग्रॅम वजनाचे दागिन्यांचा समावेश आहे.
 

पाठलाग करून पकडले अन् चाकूने वार केले
सराफा व्यावसायिक सुभाष नागरे हे दुचाकीने पुलाजवळ पोहोचले असता तेथे रुमाल बांधून उभ्या दोघांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सुभाषने प्रतिकार करीत ते सगुणा कंपनीकडे पळू लागले. दरम्यान दोन्ही चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि काही दूर अंतरावर सुभाषला पकडले. दोघांनी सुभाषला बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, सुभाष बॅग सोडत नव्हता. तेवढ्यात एकाने ‘याला घाव मार’ असे म्हटले असता दुसऱ्याने चाकूने डाव्या पायाच्या पोटरीवर वार केला. जखमी स्थितीत सुभाष जमिनीवर कोसळला असता त्याच्या हातातील बॅग हिसकावली. दरम्यान एक आणखी व्यक्ती दुचाकीने तेथे आला. त्याला मदत मागितली असता दोघेही त्याच्या दुचाकीवरून बसून रफुचक्कर झाले.

पोलिसांचा वचक झाला कमी

हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून लागोपाठ चोरी, घरफोडी, लूटमार या सारख्या गंभीर घटना घडत आहेत. मात्र, पोलिसांकडून अद्याप एकाही चोरीचा उलगडा केला नसल्याने नागरिकांत रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी खुलेआम अंमलीपदार्थ विक्री तसेच दारूची विक्री केल्या जात आहे. स्थानिक पोलिसांची याला मूक संमती असल्यानेच गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांतून केला जात आहे.

Web Title: Jewelery worth 13 lakhs stolen along with cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.