पीपीई किट घालून आलेल्या चोरट्याने पळविले रोखसह दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 05:00 AM2021-04-24T05:00:00+5:302021-04-24T05:00:06+5:30
सावळापूर येथील यशोधरा अमृत वाकडे व त्यांचे कुटुंबीय झोपले असताना पीपीई किट परिधान करून आलेल्या दोघांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कुठलाही आवाज होऊ न देता घरातील ५ हजारांची रोख रक्कम व दागिने असा एकूण १७ हजारांचा मुद्देमाल चोरला. हा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून पळ काढताना दोघांपैकी एका चोरट्याचा पाय यशोधरा यांना लागला. त्यामुळे त्या खडबडून जाग्या झाल्या व त्यांनी चोर-चोर म्हणत आरडाओरडा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : कोविड संकटाच्या काळात पीपीई किटचा वापर कोविड विषाणूपासून बचावासाठी कोविड योद्धा म्हणून काम करणारे करत आहेत. मात्र, असे असले तरी चक्क चोरटेच आता पीपीई किटचा वापर करून चोरी करत असल्याची धक्कादायक बाब आर्वी तालुक्यातील सावळापूर येथे उघडकीस आली आहे. यामुळे सावळापूरसह परिसरात दहशत पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सावळापूर येथील यशोधरा अमृत वाकडे व त्यांचे कुटुंबीय झोपले असताना पीपीई किट परिधान करून आलेल्या दोघांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कुठलाही आवाज होऊ न देता घरातील ५ हजारांची रोख रक्कम व दागिने असा एकूण १७ हजारांचा मुद्देमाल चोरला. हा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून पळ काढताना दोघांपैकी एका चोरट्याचा पाय यशोधरा यांना लागला. त्यामुळे त्या खडबडून जाग्या झाल्या व त्यांनी चोर-चोर म्हणत आरडाओरडा केला. महिलेचा आरडाओरडा ऐकून परिसरातील इतर रहिवासी जागे झाले. याच दरम्यान यशोधरा यांच्या मुलाने मोठे धाडस करत चोरट्यांचा पाठलाग केला. यावेळी एका चोरट्याने रस्त्यावरील दगड उचलून यशोधरा यांच्या मुलाच्या नाकावर मारल्याने तो जखमी झाला. चोरट्यांनी मुद्देमालासह घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. याप्रकरणी यशोधरा अमृत वाकडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
ठाणेदारांनी केली घटनास्थळाची पाहणी
या घटनेची माहिती मिळताच आर्वीचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. लवकरच या प्रकरणातील चोरट्यांना जेरबंद करू, असे पोलीस सांगत असले तरी या धाडसी चोरीमुळे परिसरात चोरट्यांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून चोरट्यांच्या शोधार्थ पोलिसांच्या दोन चमू रवाना करण्यात आल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.