जिनिंगला आग; दीड हजार क्विंटल कापूस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 09:55 PM2019-02-18T21:55:50+5:302019-02-18T21:56:03+5:30
येथील श्री गजानन शेतमाल प्रक्रिया उद्योग जिनिंगमध्ये आलेल्या वाहनाच्या गरम सायलेंसरमधून उडालेल्या ठिंगणीने आग लागली. सोमवारी सायंकाळी ४ वाजतादरम्यान लागलेल्या या आगीने रौद्ररुप धारण करुन परिसरातील कापसाच्या तीन गंज्या कवेत घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : येथील श्री गजानन शेतमाल प्रक्रिया उद्योग जिनिंगमध्ये आलेल्या वाहनाच्या गरम सायलेंसरमधून उडालेल्या ठिंगणीने आग लागली. सोमवारी सायंकाळी ४ वाजतादरम्यान लागलेल्या या आगीने रौद्ररुप धारण करुन परिसरातील कापसाच्या तीन गंज्या कवेत घेतल्या. तब्बल दोन तासानंतर ही आग आटोक्यात आली असून यात जवळपास १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
वायगाव- देवळी मार्गावर जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत ठक्कर यांच्या मालकीचा श्री गजानन शेतमाल प्रक्रिया उद्योग जिनिंग आहे. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीकरिता आणत आहे. तसेच उन्हाचाही तडाखा वाढत आहे. सोमवारी दुपारी जिनिंगमध्ये कापूस घेऊन आलेल्या वाहनाच्या सायलेंंसरमधून ठिंगणी उडाल्याने कापसाच्या गंजीला आग लागली. सायंकाळच्या सुमारास वाराही सुटल्याने ही आग चांगलीच भडकली. पाहतापाहता कापसाच्या तीन गंज्या या आगीने घेरल्या. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तब्बल एक तास उशिराने देवळी, वर्धा व हिंगणघाट येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत १ हजार ५०० ते १ हजार ६०० क्विंटल कापूस जळाला असून १ कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज जिनिंग मालक चंद्रकांत ठक्कर यांनी व्यक्त केला. देवळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस, जिनिंगचे कर्मचारी, शेतकरी व गावकऱ्यांनी सहकार्य केले.