राष्ट्रीय जंतुनाशक मोहिमेत सहभागी व्हा!
By Admin | Published: September 7, 2016 01:05 AM2016-09-07T01:05:43+5:302016-09-07T01:05:43+5:30
आतड्याचा कृमीदोष मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतामुळे होतो. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव, हे मुख्य कारण आहे
दिलीप उटाणे : रत्नापूर येथे जनजागृती सभा; भिडी येथे पालक सभेतून माहिती
वर्धा : आतड्याचा कृमीदोष मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतामुळे होतो. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव, हे मुख्य कारण आहे. मुलांना वरील आजार होऊ नये म्हणून सहभागी व्हावे. जंतसंसर्ग होऊ नये म्हणून हात स्वच्छ धुवावे. शौचालयाचा वापर करावा. पायात चपला, बुट घालावे. निजंर्तुक व स्वच्छ पाणी प्यावे. नखे नियमीत कापावी. एल्बेंडेझॉल ४०० मि.ग्रॅम गोळी विनामूल्य देण्यात येणार आहे. १ ते २ वर्षे वयाच्या मुलांना अर्धी तर २ ते १९ वर्षे मुलांना १ गोळी देण्यात येणार आहे. मुले कृमीमुक्त करण्यासाठी शपथ घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले.
राष्ट्रीय जंतुनाशक दिन बुधवारी १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना एल्बेंडेझाँल या गोळ्या खाऊ घालून साजरा करण्यात येत आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूरतर्फे रत्नापूर येथे मंगळवारी जनजागृती सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बालवीर गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अक्षय पंडित होते. यावेळी शुभम, हेमा, मोना व मंगेश नेहारे, कृणाल व सुमित पंडित, अभिजीत वाघमारे, शारदा वाघ, वैभव मडावी, आशिष तोडासे यांनी विचार व्यक्त केले. मोहिमेची जागृती करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एम. दिदावत, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर यांनी केले आहे. संचालन आरोग्य सेविका वृंदा घोडमारे यांनी केले तर आभार महावीर पंडित यांनी मानले. भिडी जि.प. शाळेत पालक सभेत विस्तार अधिकारी शंकर फरकाडे यांनी मोहिमेची माहिती दिली.(कार्यालय प्रतिनिधी)