नायब तहसीलदारांकडून श्रावण बाळांची थट्टा
By Admin | Published: June 25, 2014 12:37 AM2014-06-25T00:37:17+5:302014-06-25T00:37:17+5:30
संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अजय झिले यांना सौजन्याचे धडे नव्याने शिकण्याची गरज आहे. कार्यालयात माहिती विचारण्यास गेलेल्या वृद्धांशी त्यांची वागणूक असभ्यतेची आहे.
भौतिक चाचणीची आडकाठी : तुटपुंज्या रकमेवर गदा
आकोली : संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार अजय झिले यांना सौजन्याचे धडे नव्याने शिकण्याची गरज आहे. कार्यालयात माहिती विचारण्यास गेलेल्या वृद्धांशी त्यांची वागणूक असभ्यतेची आहे. यामुळे निराधार तहसील कार्यालयाची पायरी चढताना विचार करतात़ या प्रकरणी कारवाईची मागणी होत आहे़
शासनाने वृद्ध, विधवांना मदतीचा हात म्हणून आयुष्याच्या संध्याकाळी फुल ना फुलाची पाकळी मदत रूपातून देण्याकरिता श्रावण बाळ योजना सुरू केली. हातात पडणाऱ्या अल्प रकमेने निराधारांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते; पण भौतिक चाचणीच्या नावाखाली अनेक निराधारांच्या तुटपुंज्या रकमेवर गदा आली. ज्यांना मदतीची गरज आहे, अशा शेकडो निराधारांचे अनुदान थांबविले. अनुदान बंद का केले, हे विचारण्यास कार्यालयात जाणाऱ्या श्रावण बाळांना नायब तहसीलदार समाधानकारक उत्तरे न देता परत पाठवितात. एवढेच काम आहे काय, तुम्हाला कुणी पाठविले माझ्याकडे, अशा प्रश्नांच्या सरबत्तीने वयोवृद्धांची बोबडी वळते़ तो पुन्हा कार्यालयाकडे फिरकत नाही.
तहसील कार्यालयाच्या आवारात फेरफटका मारताना निराधार डोळ्यात अश्रू आणून येथे मिळणाऱ्या सापत्न वागणुकीचा पाढा वाचतात़ दिवसभर झाडाखाली ताटकळत बसूनही न्याय पदरी पडत नसल्यामुळे हिरमुसलेले निराधार घरचा रस्ता धरतात. याबाबत झिले यांच्याशी अनेकदा संपर्क केला़ त्यांचा भ्रमणध्वनी खणखणतो; पण ‘कॉल रिसिव्ह’ करण्याची तसदी ते घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़(वार्ताहर)