गांधींना उलगडणारा वस्तूमय प्रवास
By admin | Published: October 1, 2014 11:27 PM2014-10-01T23:27:04+5:302014-10-01T23:27:04+5:30
देशाला स्वयंपूर्ण करायचे असेल तर आपल्याला गरज असलेली प्रत्येक वस्तू आपणच बनविली पाहिले. यातून आपण स्वयंपूर्ण तर होऊच पण कुणाकडे हात पसरवून आर्थिक गुलाम होण्याची गरज पडणार नाही.
महात्मा गांधी जयंती विशेष : गांधींनी न वापरलेल्या वस्तू संग्रही
पराग मगर - वर्धा
देशाला स्वयंपूर्ण करायचे असेल तर आपल्याला गरज असलेली प्रत्येक वस्तू आपणच बनविली पाहिले. यातून आपण स्वयंपूर्ण तर होऊच पण कुणाकडे हात पसरवून आर्थिक गुलाम होण्याची गरज पडणार नाही. हे त्याच काळात ओळखल्याने ते स्वयंपूर्र्णतेबाबत आग्रही होते. आणि ते जमत नसेल तर मर्यादित गरजा हे सूत्र त्यांनी आयुष्यभर जपले. मगनवाडी संग्रहालयात ठेवलेल्या त्यांच्या वस्तू पाहून ते प्रत्ययास येते. त्या वस्तू पाहतानाचा प्रवासही गांधींना नव्याने भेटल्याचा भास करवून देतो. महात्मा गांधी यांच्या १४५ व्या जयंतीदिनी घेतलेला त्याचा खास आढावा.
महात्मा गांधींनी खादी आणि ग्रामोद्योग यांचा वापर स्वातंत्र्यप्राप्तीचे अस्त्र म्हणून केले. गांधीजींचे पुतणे मगनलाल गांधी यांनी खादी आणि ग्रामोद्याग करीत असलेल्या कारागिरांना शोधून काढले आणि त्या उत्पादन प्रणालीला पुनर्जीवित केले. त्यामुळे गांधीजींनी मगनलाल यांच्या जुळलेल्या स्थानांना शोधून काढून तेथे त्यांच्या नावे वास्तू स्थापन केल्या. त्यातीलच एक म्हणजे वर्ध्यातील मगन संग्रहालय. या संग्रहालयाचे उद्घाटन १९३४ साली गांधीजींनी केले.
सेवाग्राम आश्रमात गांधीजी वापरत असलेल्या अनेक वस्तू मगनसंग्रहालयात ठेवलेल्या आहेत; परंतु अनेकांना माहीत नसलेल्या गांधीजींनी वापरातल्या तर काही न वापरलेल्या वस्तू येथे जतन करून आहेत. या वस्तंूमधून गांधींना उलगडणारा प्रवास त्यांच्या वेगळ्या स्वरूपाचे दर्शन घडवितो. यातल्या बहुतेक वस्तू या गांधींना भेट दिलेल्या आहेत. यामध्ये अतिशय सुंदर व बारिक कलाकुसर केलेली लाकडाची थाळी, पानपुडा, फोटोफ्रेम, पाण्याचा कमंडलू, कलाकुसर केलेले लाकडाचे सुंदर बक्से नजरेस पडतात. ताडाच्या पानावर बंगाली भाषेत लिहिलेली गांधींची आत्मकथा, वेगवेगळे शंख, बुद्धाची प्रतिमा, काठी, बापू दक्षिण आक्रिकेत मे १९२४ मध्ये देण्यात आलेली चामड्याची पेटी(नेटाल), बापुंची हस्तलिखितं, गांधीजी तुरुंगात असताना त्यांनी वापरलेले चमचे, चाकू, ते वापरत असलेला सर्वात लहान तकली चरखा, जपमाला अशा अनेक वस्तू एका प्रवासासारख्या भासतात.