आले सिने कलावंतांचे दिवस
By admin | Published: October 12, 2014 11:49 PM2014-10-12T23:49:45+5:302014-10-12T23:49:45+5:30
विधानसभेचे मैदान मारण्यासाठी रिंगणातील सर्वच उमेदवार प्राण आणि पत पणाला लावत आहेत़ १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने सोमवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस राहणार आहे़ केवळ
प्रशांत हेलोंडे - वर्धा
विधानसभेचे मैदान मारण्यासाठी रिंगणातील सर्वच उमेदवार प्राण आणि पत पणाला लावत आहेत़ १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने सोमवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस राहणार आहे़ केवळ एकच दिवस शिल्लक असल्याने उमेदवार रॅली आणि शक्ती प्रदर्शनावर भर देत असल्याचे दिसते़ यात मतदारांचे लक्ष वेधून घेण्याकरिता सिने तारकांचा सहभाग वाढविला जात असल्याचेही दिसून येत आहे़ तत्पूर्वी वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघांमध्ये झालेल्या नेत्यांच्या सभांतील शेरेबाजीने मतदारांचे मनोरंजन केले आहे़ आता निर्णय घेण्याची वेळ मतदारांची असल्याने प्रत्येकच उमेदवार त्यांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत़
मतदारांमध्ये हशा पिकविणारे, टोलेबाजी करणारे, गर्दी खेचणारे आणि मतदारांना खिळवून ठेवणाऱ्यांपैकी विलास देशमुख व गोपीनाथ मुंडे यांची कमी या निवडणुकीत महाराष्ट्राने अनुभवली़ असे असले तरी सर्वच नेत्यांनी आपापल्या परीने सभा गाजविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते़ वर्धा जिल्ह्यात भाजपाच्या उमेदवाराकरिता अमीत शहा, नितीन गडकरी, स्मृती इराणी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत काँगे्रस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर तोफ डागली़ शिवाय भाजपचे उमेदवार निवडून आल्यास काय करणार, हे देखील मतदारांना सांगण्याचा प्रयत्न केला़ शिवसेनेच्या उमेदवारांकरिता उद्धव ठाकरे यांची सभा घेण्यात आली होती़ त्यांनीही मतदारांना खिळवून ठेवत युती का तुटली, भाजप, काँगे्रस, राष्ट्रवादी कसे राजकारण करीत आहे, यावर भाष्य केले़ मनसेच्या उमेदवाराकरिता राज ठाकरे यांनी सभा घेत युती-आघाडीचे राजकारण आणि मनसेची महाराष्ट्र विकासाची ‘ब्लू-प्रिंट’ यावर प्रकाश टाकत मतदार जोडण्याचा प्रयत्न केला़ राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमदेवाराचा प्रचार करण्यासाठी शरद पवार, अजित पवार, आऱआऱ पाटील व सुप्रिया सुळे यांनी सभा गाजविल्या़ या नेत्यांनीही काँगे्रस, भाजपा आणि शिवसेनेवर तोफ डागली़ काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता अशोक गहलोत, अशोक चव्हाण, दीग्विजय सिंग आदी नेत्यांच्या सभा झाल्या़ या नेत्यांनी काँगे्रस सत्तेत असताना किती विकास झाला आणि विरोधक कसा खोटा प्रचार करतात, यावर भाष्य करीत मतदारांच्या मनात उतरण्याचा प्रयत्न केला़ जिल्ह्यात सुमारे १२ नेत्यांच्या सभा झाल्या़ या नेत्यांनी विविध ठिकाणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत शेरेबाजी केली़ या सभांमुळे प्रचाराचा फड चांगलाच रंगला होता़ काल-परवापर्यंत सोबत फिरणारी नेतेमंडळी आरोप करीत असल्याने मतदारांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले़
नेत्यांच्या सभा झाल्यानंतर आता रॅली, पदयात्रांचे दिवस आले आहेत़ या रॅलीमध्ये शक्ती प्रदर्शन केले जाणार असून मतदारांचे लक्ष वेधण्याकरिता विविध क्लूप्त्यांचा वापरही केला जाणार आहेत़ या कार्यास रविवारपासूनच प्रारंभही करण्यात आल्याचे दिसते़ वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघांमध्ये आजपर्यंत वर्षा उसगावकर, अल्का कुबल, सुनील शेट्टी, शशांक केतकर यांच्यासह सिने पार्श्वगायिका वैशाली माडे यांनी हजेरी लावली़
पदयात्रा, रॅलीमध्ये गर्दी जमावी, मतदारांचे लक्ष वेधून घेता यावे यासाठी सिने कलावंतांना पाचारण केले जात आहे़ यासाठी काही उमेदवार आपल्या हितसंबंधांचा वापर करताना दिसून येतात तर काही उमेदवारांना भरमसाठ पैसा खर्च करून सिने कलावंतांचा सहभाग पदरी पाडून घेत असल्याचेही दिसून येत आहे़
वर्धा जिल्ह्यातील आर्वी, वर्धा, देवळी आणि हिंगणघाट या चारही विधानसभा मतदार संघामध्ये सिने कलावंतांनी हजेरी लावून आपापल्या उमेदवारांचा प्रचार केला़ चारही मतदार संघात सिने कलावंतांना पाहण्याकरिता गर्दी केल्याचे दिसून आले़ असे असले तरी ही गर्दी मतांमध्ये परावर्तित करण्याकरिता उमेदवारांनाच आपले कसब पणाला लावावे लागणार आहे, हे विशेष!