जामणी बेड्यावरील दारूभट्ट्या उद्ध्वस्त
By admin | Published: January 12, 2017 12:36 AM2017-01-12T00:36:08+5:302017-01-12T00:36:08+5:30
नजीकच्या जामणी पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळल्या जात असल्याची माहिती सेलू पालिसांना मिळाली.
खड्ड्यांत पुरले होते ड्रम : ८८ हजारांचा दारूसाठा नष्ट
'आकोली : नजीकच्या जामणी पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळल्या जात असल्याची माहिती सेलू पालिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी येथे धाड टाकत शोध मोहीम राबविली असता मोठ्या प्रमाणात दारूसाठा मिळून आला. येथे खड्डे करून मोहा सडवा भरून ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यामळे जेसीबीच्या सहायाने येथे खोदकाम करून दारूसाठा जप्त करण्यात आला. बुधवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ८८ हजार रुपयांची दारू नष्ट करण्यात आली.
पोलिसांनी राबविलेल्या या वॉशआऊट मोहिमेत चिल्लर दारूविक्रीला ब्रेक लागणार असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत अनेकदा पारधी बेड्यावर धाडी टाकण्यात आल्या, पण पोलीस माघारी फिरले की, लगेच ड्रम दारू गाळण्याची सामुग्री आणून नव्याने धंदा सुरू केला जात असल्याचे समोर आले आहे. या मोहीमेत ठाणेदार संजय बोथे यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर वर्धापूरकर, रवींद्र खरे, पोलीस नायक निखील काळे, एएसआय विनोद वानखेडे, गजानन वाठ यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.(वार्ताहर)